बदनापूर तालुक्‍याचे ठिकाण; पण एक्‍स्प्रेस थांबेनात

आनंद इंदानी
शनिवार, 14 डिसेंबर 2019

मुंबई, हैदराबाद अशा लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जालना अथवा औरंगाबाद रेल्वेस्थानकावर जाऊन पुढचा प्रवास करावा लागतो. एकूणच यामुळे बदनापूर तालुक्‍यातील प्रवाशांचा पैसा आणि वेळ वाया जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्वच जलद रेल्वेगाड्यांना बदनापूर स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. 

बदनापूर (जि.जालना) -  तालुक्‍याचे ठिकाण असलेल्या बदनापूर रेल्वेस्थानकावर मराठवाडा एक्‍स्प्रेस व नव्याने सुरू झालेल्या औरंगाबाद-नांदेड एक्‍स्प्रेस रेल्वेगाडीव्यतिरिक्त कुठलीही जलद रेल्वे थांबत नाही. त्यामुळे मुंबई, हैदराबाद अशा लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जालना अथवा औरंगाबाद रेल्वेस्थानकावर जाऊन पुढचा प्रवास करावा लागतो. एकूणच यामुळे बदनापूर तालुक्‍यातील प्रवाशांचा पैसा आणि वेळ वाया जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्वच जलद रेल्वेगाड्यांना बदनापूर स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. 

विकासकामे होतायत; पण समस्याही कायम 
बदनापूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म उभारणी, पादचारी पूल (दादरा) उभारणीची काम प्रगतिपथावर आहे. साधारण वर्ष 2020 च्या मध्यापर्यंत हे काम चालेल, असा अंदाज आहे. शिवाय बदनापूर स्थानकावर मागील काही महिन्यांपासून जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेगाड्यांची ध्वनिक्षेपकावरून उद्‌घोषणाही होत आहे. त्या बाबतीतही प्रवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे; मात्र जलद रेल्वे थांब्याच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाकडून बदनापूरची कायम उपेक्षाच झाली आहे. 

Image may contain: one or more people, motorcycle, outdoor and nature
रेल्वेस्थानकाकडे जाणारा कच्चा रस्ता.

स्थानकासाठी अजूनही कच्चा रस्ता 
जालना जिल्ह्यातील परतूर, जालना आणि बदनापूर असे तीन तालुके रेल्वेने जोडलेले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या बाबतीत बदनापूर तालुका तसा सुदैवी आहे; मात्र रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, स्थानकावर बसण्यासाठी व्यवस्थित आसनव्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नळाचे स्वतंत्र स्टॅंडपोस्ट नाही. एकच स्वच्छतागृह असून तेही कायम बंद असते. रेल्वेस्थानकावर उंच प्लॅटफॉर्म नाहीत, अशा समस्या आहेत. सध्या रेल्वे प्रशासनाला बदनापूर स्थानकाच्या विकासाचा मुहूर्त गवसला आहे. त्यामुळे मागील चार वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वेच्या इमारतीसमोर आताशी कुठे प्लॅटफॉर्म उभारणीचे काम सुरू झाले आहे. शिवाय रेल्वे थांबलेली असताना देखील प्रवाशांना दोन्ही बाजूला जाता-येता यावे म्हणून पादचारी पूल (दादरा) कामही सुरू झाले आहे. 

हेही वाचा : जालना झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी

जलद रेल्वेअभावी प्रवाशांचे हाल 
बदनापूर तालुक्‍याचे मुख्यालय, बाजारपेठ व शैक्षणिक केंद्र असल्यामुळे येथे दररोज रेल्वेने अनेक सरकारी नोकरदार, व्यापारी व विद्यार्थी प्रवास करतात; मात्र येथे मराठवाडा एक्‍स्प्रेस व नव्याने सुरू झालेली औरंगाबाद-नांदेड जलद रेल्वेगाडीव्यतिरिक्त जनशताब्दी एक्‍स्प्रेस, देवगिरी एक्‍स्प्रेस, तपोवन एक्‍स्प्रेस, काकीनाडा एक्‍स्प्रेस, मुंबई-नागपूर एक्‍स्प्रेस आदी दररोज धावणाऱ्या जलद रेल्वेगाड्या थांबत नाहीत. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नोकरदार व विद्यार्थ्यांना मोजक्‍याच पॅसेंजर रेल्वेगाड्यांवर विसंबून राहावे लागते. त्यामुळे त्यांचा मोठा वेळ वाया जात आहे. तर दुसरीकडे लांबपल्ल्याच्या जलद रेल्वे थांबत नसल्यामुळे व्यापार-उद्योग, शासकीय कामानिमित्त मुंबई-नागपूर व हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांना देखील गैरसोय सहन करावी लागते. एकूणच अशा परिस्थितीत प्रवाशांना रेल्वेचे तिकीट आरक्षित करणे व पुढच्या प्रवासासाठी जालना अथवा औरंगाबादचे रेल्वेस्टेशन गाठावे लागते. 

No photo description available.
रेल्वेस्थानकावरील बंद असलेले स्वच्छतागृह.

थांब्याबाबत रेल्वे प्रशासनाचा दुजाभाव 
बदनापूर तालुक्‍याचे ठिकाण आहे कदाचित हे रेल्वे प्रशासनाच्या गावी नसावे. रेल्वे प्रशासनाने तालुक्‍याचे स्थानक असलेल्या जालना, परतूर, सेलू, मानवत अशा ठिकाणी जलद रेल्वेला थांबा देण्यास मान्यता दिलेली आहे. या ठिकाणी बहुतांश जलद रेल्वेगाड्या थांबतात. मात्र त्याच तालुक्‍याच्या दर्जाचे बदनापूर रेल्वेस्थानक असताना या ठिकाणी जलद रेल्वेला थांबा का नाही? असा प्रश्न उपस्थित करून रेल्वे प्रशासन बदनापूरशी दुजाभाव करतोय अशी भावना बदनापूर तालुक्‍यातील प्रवाशांतून होत आहे. येथील प्रवाशांची संख्या कमी असल्याचे स्पष्टीकरण रेल्वे प्रशासन कायम देत आले आहे; मात्र बदनापूर रेल्वेस्थानकावर आवश्‍यक सुविधा उपलब्ध केल्यास शिवाय या ठिकाणी लांबपल्ल्याच्या जलद रेल्वेला थांबा दिल्यास निश्‍चित प्रवाशांची संख्या वाढेल, त्यातून रेल्वे प्रशासनाचेही उत्पन्न वाढेल. 

बदनापूर तालुक्‍याचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे जलद रेल्वेगाड्यांना थांबा गरजेचा आहे. यासंदर्भात आम्ही मनसेच्या वतीने रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना निवेदनही सादर केले होते; मात्र त्यांनी कमी प्रवासी संख्या असल्याचे कारण पुढे केले होते. अर्थात, रेल्वे प्रशासनाने बदनापूर स्थानकाचा विकास करून जलद रेल्वे थांबविल्यास निश्‍चितच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल. 
अनिकेत जारे, 
बदनापूर शहर उपाध्यक्ष, मनसे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Express train does not stop in Badnapur