अभियांत्रिकी, औषधनिर्माण पदविकेच्या संस्था प्रवेशासाठी रात्री आठपर्यंत मुदतवाढ

अतुल पाटील
सोमवार, 22 जुलै 2019

अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण पदविकेसाठी संस्थेत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत सोमवारी (ता. 22) रात्री आठ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश निश्‍चिती केंद्रावर जाऊन पैसे भरुन प्रवेश फ्रीज केलेल्या विद्यार्थ्यांना ही वाढीव संधी मिळाली आहे. अभियांत्रिकी पदविकेसाठी 20 जुलै तर, औषधनिर्माणशास्त्र पदविकेसाठी 21 जुलैची अंतिम मुदत होती. 

औरंगाबाद : अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण पदविकेसाठी संस्थेत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत सोमवारी (ता. 22) रात्री आठ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश निश्‍चिती केंद्रावर जाऊन पैसे भरुन प्रवेश फ्रीज केलेल्या विद्यार्थ्यांना ही वाढीव संधी मिळाली आहे. अभियांत्रिकी पदविकेसाठी 20 जुलै तर, औषधनिर्माणशास्त्र पदविकेसाठी 21 जुलैची अंतिम मुदत होती. 

प्रवेश अंतिम करण्याचा शेवटचा दिवस शनिवार आणि रविवार असल्याने संस्था म्हणजेच महाविद्यालये बंद असतील असा अनेक विद्यार्थी, पालकांना गैरसमज झाला होता. असे विद्यार्थी संस्थेत प्रवेशासाठी पोहचले तेव्हा मुदत संपल्याचे कळाले. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली होती. 

प्रवेशासाठी अडचण आलेल्या विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणच्या विभागीय केंद्रात धाव घेतली, तेथील अधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. तिथून मुंबईतील तंत्रशिक्षणच्या कार्यालयात कळविण्यात आले तेव्हा राज्यभरात शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याचे कळाले. डीटीईतर्फे याची तत्काळ दखल घेत सोमवारी (ता. 22) दुपारी चार वाजता संस्था स्तरावरील प्रवेशाची लिंक ओपन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

तंत्रशिक्षणच्या औरंगाबाद केंद्रात मराठवाड्यातून विद्यार्थी आले होते, त्यांच्यासाठी केवळ साडेचार तासांचा कालवधी मिळाला आहे. औरंगाबाद तंत्रशिक्षण विभागाकडे ज्या विद्यार्थ्यांनी याबाबत अर्ज केले होते, त्यांना फोनद्वारे तर, दुपारी तीननंतर आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सांगितले आहे. तंत्रशिक्षणच्या संकेतस्थळावरदेखील अपडेट टाकण्यात आली आहे. 

ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चिती केंद्रावर जाऊन पैसे भरुन फ्रीज करुन महाविद्यालयात प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय? त्या विद्यार्थ्यांना कसे कळणार, त्यांना मोबाईलवर संदेश पाठवले आहेत का? याबाबत मात्र अधिक माहिती मिळू शकली नाही. तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. तसेच डीटीईतर्फे देण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरपैकी एक उचलत नसून दुसरा नंबर बंद आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension upto 8pm for admission to engineering, pharmaceutical diploma