वडिलांकडून रसद बंद झाल्याने खंडणीचा घाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

औरंगाबाद - वर्धन घोडे खून प्रकरणातील संशयित अभिलाष मोहनपूरकरला त्याच्या वडिलांकडून पैसे मिळणे बंद झाले. त्यामुळे अभिलाषला अपहरणाची दुर्बुद्धी सुचली आणि त्याने खंडणीचा घाट रचला. त्याच्या एका मित्राकडे त्याने मुलाचे अपहरण करण्याचा मनसुबाही बोलून दाखविला होता. चारचाकी शोरूम टाकण्याचे त्याचे स्वप्न होते, हे पैसे तो खंडणीतून मिळविणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

औरंगाबाद - वर्धन घोडे खून प्रकरणातील संशयित अभिलाष मोहनपूरकरला त्याच्या वडिलांकडून पैसे मिळणे बंद झाले. त्यामुळे अभिलाषला अपहरणाची दुर्बुद्धी सुचली आणि त्याने खंडणीचा घाट रचला. त्याच्या एका मित्राकडे त्याने मुलाचे अपहरण करण्याचा मनसुबाही बोलून दाखविला होता. चारचाकी शोरूम टाकण्याचे त्याचे स्वप्न होते, हे पैसे तो खंडणीतून मिळविणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार - वर्धनच्या अपहरण व खून प्रकरणात अभिलाष सुधीर मोहनपूरकर व श्‍याम लक्ष्मण मगरे या दोघांना अटक झाली. त्यांनी वर्धनला उघड्या कारद्वारे दौलताबाद परिसरातील केसापुरी तांडा येथे नेले व रुमालाने गळा आवळत खून केला. या खून प्रकरणानंतर पोलिसांच्या सहासदस्यीय विशेष तपास पथकाची निर्मिती झाली.

संशयितांनी कारने जेथून प्रवास केला त्या-त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून बरीच माहिती हाती लागली. दरम्यान, अभिलाषचे कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासले. त्यात शिवाजीनगर येथील इंद्रनील पाठक याच्याशी त्याने अनेकदा संपर्क साधल्याचे पुढे आले. पोलिसांनी इंद्रनीलला ताब्यात घेत चौकशी केली. त्या वेळी पार्टीसाठी अभिलाषसोबत बसल्याचे त्याने सांगितले. तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळविले. खून प्रकरणानंतर अभिलाष व इंद्रनीलची चौकशी केली. अभिलाषला वडिलांकडून आर्थिक रसद मिळत होती; पण त्याच्या वडिलांनी आर्थिक स्थितीकडे लक्ष देऊन अभिलाषला पैसे देण्याचे टाळले होते. यातून अभिलाषने स्वत: पैसे कमविण्यासाठी शोरूम टाकण्याचे ठरविले व कामाला लागला. पुढे त्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी चुकीचा व शॉर्टकट मार्ग धरला, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली.

मिश्‍कीलपणाच वाटला
चारचाकीचे शोरूम टाकायचे, मस्त मर्सिडीज बेन्झसारख्या महागड्या गाड्या खरेदी करायच्या, अमाप नफा कमवायचा, असे स्वप्न अभिलाषचे होते. त्यासाठी तो सारखा अपहरण करून खंडणीच मागू, असा म्हणायचा; पण तो मिश्‍कीलपणे बोलत असावा, असे वाटत होते, अशी माहिती इंद्रनील पाठक याने दिल्याचेही पोलिसांनी सांगितले.

असा झाला तपास
० खून प्रकरणात ३३५ साक्षीदार तपासले
० तेराच्या आसपास नातेवाइकांची चौकशी
० आठ ठिकाणचे सीसीटीव्ही तपासणी
० आरटीओ, मुंबई पोलिसांकडून मागविली माहिती
० कॉल डिटेल्स आणि टॉवर लोकेशनचा अभ्यास

Web Title: Extortion caused jetty off supplies father