
लातूर : फडात तीन लाख मेट्रिक टन ऊस उभा
लातूर : साखर कारखान्यांनी पट्टे पाडण्यास सुरवात केल्यानंतर गाळपाविना शिल्लक ऊस राहिलेल्या शेतकऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. शेतकरी भावनिक होत असतानाच पालकमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी शिल्लक ऊसाच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात अजूनही तीन लाख मेट्रीक टन ऊस अजूनही गाळपाविना फडात उभा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे मेअखेरपर्यंत कारखाने सुरू ठेऊन संपूर्ण उसाचे गाळप करावे, असे आदेश त्यांनी बैठकीत दिले आहेत.
सर्व साखर कारखान्यानी जवळच्या गावांची परस्परांत विभागणी करून घेऊन तातडीने ऊस गाळपाचे नियोजन करावे. कोणत्याही स्थितीत ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता, आजपर्यंत झालेले गाळप, सध्या शिल्लक असलेला ऊस, ऊसतोडणी यंत्रणेची सद्यस्थिती याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर जिल्ह्यात सभासद व बिगर सभासदांचा मिळून तीन लाख मेट्रीक टन ऊस शिल्लक असल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर कारखान्यांनी नियोजन केल्यास शिल्लक उसाचे गाळप शक्य असल्याचे सांगत पालकमंत्री देशमुख म्हणाले, सभासद व बिगर सभासद असा भेद न करता सर्वांचा ऊस गाळप करावा. सोलापूर व नांदेड जिल्ह्यातील बंद होत असलेल्या कारखान्यातील यंत्रणा तातडीने मागवून घ्यावी, शेजारी जिल्ह्यातील बंद होत असलेल्या कारखान्यांतील हार्वेस्टरचे अधिगृहण करावे, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड व सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून तोडणी यंत्रणेच्या अधिगृहणाबाबत कार्यवाही करावी, कारखान्यांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने पावले उचलावीत, जिल्ह्यात कोणाचाही ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही, याबाबत शेतकऱ्यांना विश्वास द्यावा, शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या अफवा पसरवल्या जाणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी.
बबनराव शिंदे यांना स्वतः बोलणार
अधिक काळ कारखाने चालवल्यामुळे कारखान्याचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून साखर उतारा घट आणि ऊस वाहतुकीसाठी अनुदान दिले जाणार असल्याचे सांगून पालकमंत्री देशमुख यांनी नांदेड जिल्ह्यातील ऊसतोडणी यंत्रणेसाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व सोलापूरच्या यंत्रणेसाठीचे आमदार बबनराव शिंदे यांना आपण स्वतः बोलणार असल्याचे सांगितले. बैठकीला जिल्हाधिकारी पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त अमन मित्तल, साखर कारखान्यांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
Web Title: Factory Continuing Till End Of May For Three Lakh Metric Tons Of Sugarcane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..