बनावट नोटा रॅकेटला आंतरराष्ट्रीय किनार? 

उमेश वाघमारे 
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

जालना - दोन ते अडीच वर्षांपासून नियमित होतोय नोटांचा पुरवठा 

जालना -  जिल्ह्यात उघडकीस आलेल्या दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांचे रेकॅट हे दोन वर्षांपासून सक्रिय होते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे या रॅकेटला आंतरराष्ट्रीय किनार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू असून एक पथक पश्‍चिम बंगालला मंगळवारी (ता.12) रात्री उशिरा रवाना होणार आहे. 

अंबड तालुक्‍यातील शहागड येथे नऊ नोव्हेंबरला एका कापड दुकानात किरकोळ खरेदी करीत असताना संबंधिताने दोन हजार रुपयांची बनावट नोट खपविण्याचा प्रयत्न केल्यानंतर रॅकेट उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी परमेश्‍वर मारोती कानगुडे (रा. गेवराई, जि. बीड), ज्ञानेश्‍वर पंडित पानखडे (रा. राजपिंपरी, ता. गेवराई ह.मु. तीर्थपुरी, ता.घनसावंगी) या संशयितांना अटक केली. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. दोन वर्षांपासून पश्‍चिम बंगालमधून दोन हजारांच्या बनावट नोटा तयार करून त्या एजंटामार्फत नियमितपणे मागविल्या जात होत्या. या बनावट नोटा पश्‍चिम बंगाल किंवा देशाच्या सीमेलगतच्या देशातून तयार करून चलनात आल्या जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असून, एक पथक मंगळवारी (ता.12) रात्री उशिरा पश्‍चिम बंगालला रवाना होणार आहे. दरम्यान, जालना, बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रात आणखी कुठे-कुठे हे रॅकेट सक्रिय आहे, या रॅकेटमध्ये नेमक्‍या किती जणांचा समावेश आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

अशी कार्यपद्धत 
पश्‍चिम बंगालमधील एजंटशी मोबाईलद्वारे संपर्क साधून बनावट नोटांची मागणी केली जात होती. बनावट नोटांची पहिली डील करण्यासाठी आल्यानंतर प्रवासाचा खर्च म्हणून एजंटला दहा हजार रुपये दिले जात होते. डील झाल्यानंतर एजंट बनावट नोटा घेऊन पश्‍चिम बंगाल येथून बस, रेल्वेने प्रवास करून ठरलेल्या ठिकाणी येत असे. बनावट नोटा व्यवहारात खपवल्यानंतर अर्धी रक्कम एजंटला दिली जात असे, अशी या रॅकेटची कार्यपद्धत आहे, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील लिंकचे आव्हान 
दोन हजार रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणी आतापर्यंत मूळ बीड जिल्ह्यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून नऊ नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटांची ही लिंक महाराष्ट्रात कोठे-कोठे सुरू आहे, हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. हे रॅकेट दोन वर्षांपासून सक्रिय असल्यामुळे आतापर्यंत किती बनावट नोटा चलनात आल्या, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

नोटांमध्ये खूपच साम्य 
दोन हजार रुपयांची खरी नोट आणि बनावट नोटीमध्ये प्राथमिकदृष्ट्या खूप साम्य आहे. बनावट नोट ही हातात घेतल्यानंतर थोडीशी खडबडीत लागते. प्रकाशात सूक्ष्म पद्धतीने पाहिल्यास अंतर्गत दोन हजार रुपयांची संख्या दिसून येत नाही. 

तपासाची चक्रे फिरली 
बनावट नोटांच्या रेकॅटला आंतरराष्ट्रीय किनार आहे का, अशी विचार पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांच्याकडे केली असता, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या नोटा नेमक्‍या कोठे तयार झाल्या, हे तपासात लवकरच पुढे येईल, असे त्यांनी सांगितले. 

दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक पश्‍चिम बंगालला रवाना होणार आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात येईल. 
-हनुमंत वारे, पोलिस उपनिरीक्षक, जालना. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake currency