दोन हजारांसोबतच शंभराच्याही बनावट नोटा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

औरंगाबाद - चलनातील दोन हजारांच्या बनावट नोटांच्या रॅकेटचे भिंग फुटल्यानंतर संशयितांनी शंभरच्याही बनावट नोटा तयार केल्याचे गुन्हेशाखेने घातलेल्या छाप्यातून समोर आले आहे. दरम्यान, अंबड (जि. जालना) येथे बनावट नोटा तयार केल्या जात असून याप्रकरणातील मुख्य सुत्रधार पसार झाला आहे.

औरंगाबाद - चलनातील दोन हजारांच्या बनावट नोटांच्या रॅकेटचे भिंग फुटल्यानंतर संशयितांनी शंभरच्याही बनावट नोटा तयार केल्याचे गुन्हेशाखेने घातलेल्या छाप्यातून समोर आले आहे. दरम्यान, अंबड (जि. जालना) येथे बनावट नोटा तयार केल्या जात असून याप्रकरणातील मुख्य सुत्रधार पसार झाला आहे.

दोन हजारांच्या बनावट नोटा चलनात आणताना घाटीतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी महमंद इर्शादला गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी (ता. 22) रंगेहात अटक केली होती. त्याने आतापर्यंत तब्बल बनावट दीड लाख रूपये खपवल्याचे समोर आले. त्याच्याकडून दोन हजारांच्या अठरा बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. त्यानंतर नोटा पुरवणारा फिरोज देशमुख (रा. नारेगाव, मुळ अंबड) याला पोलिसांनी दोन हजारांच्या बनावट दोन नोटांसह अटक केली. पोलिस कोठडीत त्यांच्याकडून माहिती घेतली असता, नोटा अंबडमध्येच तयार होत असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून पोलिस सय्यद समीर अकबर याच्या शोधासाठी अंबड येथील दाखल झाले.

गुन्हेशाखेचे एक पथक मंगळवारी (ता. 24) समीरच्या शोधात अंबडला गेले. त्यावेळी समीरने अंबड-पाचोड रोडवर किरायाने खोली घेतल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या खोलीत छापा टाकला असता, नऊ बनावट नोटा सापडल्या. तसेच पोलिसांनी स्कॅनर, संगणक, नोटा तयार करण्यासाठी लागणारे रसायन, बॉंड पेपर व अन्य ऐवज जप्त केला; मात्र समीर पसार झाला होता. ही कारवाई औरंगाबाद गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, नसमीखान, विजयानंद गवळी, शेख नवाब, एजाजखान, पोलिस कर्मचारी श्रीमती शेख यांनी केली.

रात्रीच व्हायची छपाई
सुत्रांनी सांगितले, की हे संशयित बनावट नोटांसाठी बॉंडपेपरचा वापर करीत होते. विशेष म्हणजे ते हा प्रकार फक्त रात्रीच करीत होते. अंबडमध्ये शंभरच्या बनावट नोटा निर्मिती करणारी टोळी पकडण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा समीरच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी एक शंभराची बनावट नोट सापडली. पण ती व्यवस्थित कापलेली नव्हती, म्हणून चुरगाळून फेकली असावी, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली.

Web Title: Fake notes issue