बनावट मसाला कारखान्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

औरंगाबाद - बनावट मसाल्याच्या कारखान्यावर गुन्हेशाखेच्या पथकाने छापा घालून मसाला उत्पादक कंपनीची कॉपी केलेला तब्बल एक टन मसाला जप्त केला. हा मसाला तयार करणारा पसार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. ही कारवाई शनिवारी (ता. दोन) करण्यात आली.

औरंगाबाद - बनावट मसाल्याच्या कारखान्यावर गुन्हेशाखेच्या पथकाने छापा घालून मसाला उत्पादक कंपनीची कॉपी केलेला तब्बल एक टन मसाला जप्त केला. हा मसाला तयार करणारा पसार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. ही कारवाई शनिवारी (ता. दोन) करण्यात आली.

ब्रॅंडेड मसाला उत्पादनाची कॉपी करून शहरात स्वस्तात मसाला विक्री होत असल्याची तक्रार संबंधित मसाला कंपनीचे विक्री व्यवस्थापक राहुल नागपाल यांनी गुन्हेशाखेकडे केली. यानंतर पोलिसांनी नागपाल यांच्यासोबत शनिवारी सायंकाळी हिमायतबाग येथे पंचांसमक्ष छापा घातला. त्या वेळी एका खोलीत खुला मसाला पंख्याने वाळवला जात असल्याचे दिसले. तसेच गोण्यांत पॅकिंग केलेला मसाला होता. हा माल पोलिसांनी जप्त केला. तसेच पॅकिंगचे साहित्य व मशिनरीसह एकूण तीन लाख 66 हजारांचा ऐवज जप्त केला. दरम्यान अन्न व औषधी प्रशासनाला माहिती देऊन मसाल्याची चाचणी करण्याची सूचना पोलिस विभागाने केली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात कॉपीराईट ऍक्‍टनुसार, संशयित कारखानदारावर गुन्ह्याची नोंद झाली. ही कारवाई गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक प्रशांत आवारे, डी. एस. राठोड, सुनील पाटील, एस. सी. राठोड, शिवा बोर्डे, सरिता भोपळे यांनी केली.

स्वस्तात "मस्त‘
कंपनीचे ब्रॅंड वापरून हिमायतबागेत एका घरात मसाला तयार केला जात होता. पंख्याखाली वाळवून तिथेच ब्रॅंडेड पॅकिंगसारखी तीस व पन्नास ग्रॅमची हुबेहूब पॅकिंग केली जात होती. 200 ग्रॅममागे 20 ते 25 रुपयांनी मसाला बाजारात स्वस्त दिला जात होता, अशी माहिती निरीक्षक सावंत यांनी दिली.

असा आला संशय..
होलसेल किमतीपेक्षाही स्वस्तात मसाला किरकोळ दुकानदारांना का विक्री करता, अशी विचारणा होलसेल विक्रेत्यांनी कंपनीकडे केली. त्यानंतर कंपनीने शहानिशा केली असता, आपल्याच मालाची बाजारात कॉपी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर कंपनीच्या विक्री व्यवस्थापकाने शहर पोलिसांकडे तक्रार केली.

Web Title: Fake spice factory raid on the