Video : खंडोबा का नसतात चंपाषष्ठीला मंदिरात?

संकेत कुलकर्णी
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात सातारे गावात मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला खुद्द खंडोबा मात्र या देवळात नसतात.

औरंगाबाद : शहरालगतच्या सातारा गावात खंडोबाचं पुरातन देऊळ आहे. डोंगरातल्या यादवकालीन मंदिरातून खंडोबा गावात मुक्कामी आले आणि मराठा कालखंडात भव्य मंदिर उभं राहिलं. या खंडोबाच्या दर्शनासाठी मराठवाडाभरातून भाविक येतात, पण ऐन उत्सवात चंपाषष्ठीला खंडोबा या मंदिरातून निघून जातात. 

सातारा गावात मराठा कालखंडात उभारण्यात आलेल्या खंडोबा मंदिराला काही वर्षांतच भग्नावस्था आली. आक्रमकांनी उध्वस्त केलेलं हे देऊळ मग इंदूरच्या महाराणी अहल्यादेवी होळकर यांनी पुन्हा दिमाखात उभं केलं.

Satara Khandoba Aurangabad
सातारे गावातलं देऊळ

खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला मात्र या देवळातून खंडोबा गावातल्या दांडेकरांच्या वाड्यात जातात. मंदिरात दर्शनाला येणारे भाविक प्रतिमूर्तीचे दर्शन घेतात. पण देवाच्या मूळ तांदळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना दांडेकरांच्या वाड्यात जावे लागते. 

पहा व्हिडिओ - 

कोठे जातात मल्हारी मार्तंड?

चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी सात वाजता शहरातील आमदार, खासदार, महापौर यांच्यासह मोठमोठे लोक मंदिरात जमतात. महाआरती होते. त्यानंतर आठ वाजता खंडोबारायांची पालखीत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंदिरातून निघालेल्या या पालखीतून खंडोबारायाच्या मूळ शेंदरी तांदळ्याचे गावातील दांडेकरांच्या वाड्यात आगमन होते. तिथे वाड्याचे मालक दिलीप दांडेकर रुद्राभिषेक करतात. कुलाचार, पुरणावरणाचा नैवेद्य, सोबतच बाजरीचा रोडगा, वांग्याचे भरीत यांचा विशेष नैवेद्य अर्पण करण्यात येतो. दिवसभर मंदिरात दर्शनाला येणारे भाविक दांडेकरांच्या वाड्य़ात येऊन खंडोबाचे दर्शन घेतात. 

Satara Khandoba Aurangabad
सातारा गावातील डोंगरातील खंडोबाचे भग्न देऊळ

काय आहे नेमकी कथा?

गोदावरीच्या काठावर सिद्धेश्वराचे देऊळ बांधणारे नानासाहेब पेशव्यांचे गुरू नारायणबुवा दीक्षित यांना सातारे हे गाव जहागीर देण्यात आले होते. या गावालगतच्या डोंगररांगेत कडेपठारावर खंडोबाचे पुरातन देऊळ आहे. गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील या देवळात ते नित्यनेमाने दर्शनाला जात असत.

Satara Khandoba Aurangabad
डोंगरातल्या देवळात नंतर ठेवलेली खंडोबाची मूर्ती

वार्धक्यामुळे त्यांना रोज डोंगर चढून जाणे अशक्य झाले, म्हणून त्यांच्या विनंतीवरून खंडोबा गावात मुक्कामी आले. गावात खंडोबाचे भव्य मंदिर उभारले गेले. तेव्हापासून खंडोबा चंपाषष्ठीला जहागीरदारांच्या वाड्यात येऊन पाहुणचार घेतात, अशी कथा सांगितली जाते. कडेपठारावर आजही हे सुमारे १३व्या ते १४व्या शतकातील उत्तर यादवकालीन मंदिर भग्नावस्थेत उभे आहे. गावात नारायणगुरूंच्या नंतर ही जहागीर दांडेकर घराण्याकडे आली. त्यांनी ही प्रथा आज तीनशे वर्षांनंतरही सुरू ठेवली आहे. 

Satara Khandoba Aurangabad
खंडोबाच्या दर्शनासाठी झालेली गर्दी

रात्री पुन्हा मंदिरात मुक्कामी

दांडेकरांच्या वाड्यात दिवसभर पाहुणचार घेऊन खंडोबा मुक्कामाला पुन्हा मंदिरात येतात. रात्री आठ वाजता वाड्यापासून वाघ्या-मुरळीच्या पथकासह खंडोबाची पालखी पुन्हा मंदिरात येते. इकडे दिवसभर देवळात वाघ्या-मुरळींचा जागर-गोंधळ सुरू असतो. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ घालत भंडारा-खोबऱ्याची तळी उचलतात. मंदिर संस्थानकडून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. मंदिराच्या परिसरातच चुली पेटवून त्यावर बनवलेला बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत असा प्रसाद वाटप केला जातो.

Satara Khandoba Aurangabad
वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ

हेही वाचा - 

जमीन खरेदी करण्यापूर्वी इथं क्लिक करा

दारूवरून केले वार, 10 वर्षे शिक्षा कायम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Famous Satara Khandoba Yatra Near Aurangabad