संतप्त शेतकऱ्यांनी महाबीज कार्यालयात काढली रात्र

मंगेश शेवाळकर
शनिवार, 16 जून 2018

कळमनुरी तालुक्‍यातील कांडली येथील शेतकरी महाबीजचा सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम मागील काही वर्षापासून घेतात. या वर्षी 16 शेतकऱ्यांनी 95 बॅग सोयाबीन घेतले होते. कांडली परिसरात मोठा पाऊस झाल्यानंतर त्यापैकी 56 बॅग सोयाबीन पेरणी केली मात्र बियाणे उगवले नाही.

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कांडली येथील संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारची ( ता. १५ ) रात्र महाबीजच्या हिंगोली जिल्हा कार्यालयात काढली. जोपर्यंत सोयाबीन बॅग दिले जाणार नाहीत तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

कळमनुरी तालुक्‍यातील कांडली येथील शेतकरी महाबीजचा सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम मागील काही वर्षापासून घेतात. या वर्षी 16 शेतकऱ्यांनी 95 बॅग सोयाबीन घेतले होते. कांडली परिसरात मोठा पाऊस झाल्यानंतर त्यापैकी 56 बॅग सोयाबीन पेरणी केली मात्र बियाणे उगवले नाही. याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये बियाण्यांची उगवण क्षमता केवळ दहा टक्के आढळून आली आहे.यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उगवण न झालेल्या बॅग  महामंडळाने द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

या मागणीसाठी कांडली येथील शेतकरी शुकवार ( ता१५ ) सकाळ पासून महाबीजच्या हिंगोली जिल्हा कार्यालयात ठाण मांडून आहेत. रात्री उशिरा शेतकरी घरी जातील अशी अपेक्षा होती. मात्र या शेतकऱ्यांनी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून बाहेर पडणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे शेतकरी शुक्रवारी (ता.१५) कार्यालयात ठाण मांडून होते. काही शेतकऱ्यांनी कार्यालयातच झोपही घेतली. शनिवारी ( ता. सोळा ) बियाणांचा सोक्षमोक्ष लावल्या शिवाय जाणार नसल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे कार्यालय अडचणीत सापडले आहे.

Web Title: farmar agitation in Hingoli