शेतकऱ्यांना १५३ कोटींचा फटका

हरी तुगावकर
मंगळवार, 8 मे 2018

लातूर - शासनाने काही शेतमालाला हमीभाव ठरवून दिले असले तरी बाजारात मात्र हमीभावाने शेतमालाची खरेदी होत नाही. हमी भावापेक्षा एक ते दीड हजार रुपये कमी दराने खरेदी होत आहे. जाहिराती करून शासनाने हमी भावाने खरेदी केंद्र सुरु केली असली तरी ती नावालाच आहेत. या सर्वांचा परिणाम चालू हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५३ कोटींचा फटका बसला आहे. ही फक्त लातूर अडत बाजाराची परिस्थिती आहे. राज्यातील इतर बाजार समितीच्या अडत बाजारातील हा फटका मोठा आहे.

देशभर उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असे गृहीत धरून हमीभाव द्यावा, अशी मागणी होत आहे. पण शासनाच्या वतीने या मागणीला फाटा देत दरवर्षी हमी भाव जाहीर केला जात आहे. पण हा भावदेखील बाजारात मिळत नसल्याचे सातत्याने दिसत आहे. शासनाच्या वतीने हमी भावाप्रमाणे खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. चालू हंगामात तर ती केवळ नावालाच असल्याचे दिसत आहे. या केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी केली जात नाही. बारदाना नाही, गोदाम नाही म्हणून खरेदी केंद्र बंद आहेत. पेमेंट लवकर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. या सर्व प्रकारात बाजारात आपला शेतमाल विकल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्यायच नाही. यातून सध्या हमी भावापेक्षा एक ते दीड हजार रुपये कमी भावाने शेतमालाची खरेदी होत आहे. लातूर बाजार समितीच्या अडत बाजारात चालू हंगामात उडीद, तूर, सोयाबीन व मूग या चारच शेतमालाची ४९ लाख क्विंटल खरेदी-विक्री झाली आहे. याचे हमी भावाप्रमाणे एक हजार ७२८ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. पण बाजारात सरासरी भावाप्रमाणे केवळ एक हजार ५७५ कोटी रुपयेच पदरात पडले. यात शेतकऱ्यांना १५३ कोटींचा फटका बसला आहे. या बाजारात सोयाबीनची एक हजार ५० रुपये, मुगाची एक हजार ६५, उडिदाची एक हजार ३०५ व तुरीची एक हजार ४३० रुपये हमी भावापेक्षा कमी दराने विक्री झाली आहे.

Web Title: farmer 153 crore rupees loss