नागरिकांना मिळणार थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

औरंगाबाद - शहरातील जनतेला थेट शेतकऱ्यांकडून ताजा भाजीपाला, फळे व धान्य मिळावे यासाठी महापालिका नागरिकांना सोयीचे ठरेल अशा ठिकाणी एका दिवसासाठी आठवडे बाजाराला जागा उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी पणन मंडळाच्या मागणीनुसार जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या संदर्भातील ठराव येत्या शुक्रवारी (ता.17) होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

नगरविकास विभागाने जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार राज्य शासनाने संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवडे बाजाराच्या अभियानासाठी पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची समन्वय संस्था म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. या आठवडे बाजारात फक्‍त शेतकरीच ताजी फळे, भाजीपाला व शेतमालाची विक्री करणार आहेत.

याशिवाय या बाजारात शेतकरी, शेतकऱ्यांचे गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी उत्पादक सहकारी संस्थांचे सदस्यच शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये दलालाची साखळी नसल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार आहे, तर नागरिकांना योग्य दरात चांगला शेतमाल मिळणार आहे. पणन मंडळाने महापालिकेकडे नोंदविलेल्या मागणीनुसार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी सर्वांच्या संमतीने आणि नागरिकांना सोयिस्कर ठरेल अशा जागी संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार भरविण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे आठवडे बाजार झाल्यानंतर आयोजकांतर्फे त्या जागेची स्वच्छता करून दिली जाणार आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांच्या सोयीसाठी जागा विनामूल्य देण्याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

Web Title: farmer agriculture goods gives to public