शेतीची नापिकी, मुलाच्या आजारपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

शेतीची नापिकी, मुलाच्या आजारपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

मंठा : गेवराई (ता. मंठा) येथील शेतकऱ्याने पाडव्याच्या दिवशी गुरुवारी (ता. 8) शेतीची नापिकी, कर्ज बाजारी व मुलाच्या आजारपणाला कंटाळून शेतात विष पिऊन आत्महत्या केली आहे. 

गेवराई (ता. मंठा) येथील उद्धव परसराम गायकवाड (वय 50 वर्ष) या शेतकऱ्यास गावा जवळ मंठा मंडळात एक हेक्टर शेती असून त्यांनी कापूस, सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. पण यातून सोयाबीन सोबतच कापसाचे देखील अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तरी देखील रात्रीच्या वेळी पिक सांभाळण गरजेचे आहे. म्हणून उद्धव गायकवाड गुरुवारी रात्री पाडव्याचा सण साजरा करुन व जेवण करून नेहमी प्रमाणे शेतात गेले. शुक्रवारी (ता. 9) सकाळी उशिरापर्यंत वडील घरी न आल्याने त्यांचा मुलगा वडीलांना पाहण्यासाठी शेतात गेला असता वडीलांनी विष पिल्याचे निदर्शनास आले. गावातील लोकांनी तातडीने त्यांना मंठा येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुन्हा तेथून जालना येथे उपचाराकरिता हलविण्यात आले. परंतु, यातच त्यांचा मृत्यू झाला असून जालना पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. 

उद्धव गायकवाड यांना एक हेक्टर शेती असून गेल्या चार पाच वर्षापासून शेतीत तोटा सहन करावा लागल्याने कर्जाचा डोंगर वाढला होता. त्यामुळे दोघ नवरा बायको स्वतःच्या शेती बरोबरच ते इतरत्र कामधंदा करीत होते. त्यांना दोन मुल व एक मुलगी असून मुलीचे नुकतेच बाळांतपण झाले आहे. एक मुलाचे डिएड् झाले असुन लवकरच नोकरी लागेल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु अचानक त्या मुलाचे दोन्ही पाय लुळे झाल्याने त्याच्या उपचारासाठी भरपूर खर्च झाला. तरिही त्याचा उपयोग झाला नाही. कर्ता मुलगा अपंग झाला तर दुसरा मुलगा बारवीत शिक्षण घेत आहे. 

घर, शेती, मुलीचे बाळांतपण, मुलाचे आजारपणाचा खर्च अशात उत्पन्नाचे काहीच साधन नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला व नविन कर्ज मिळानेसे झाल्याने हाताश होऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. 

त्यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा मंठा, बुलढाणा अर्बन बँक, शाखा मंठा व महेंद्रा फायनान्स कंपनी आदींचे अंदाजे पाच लाख रुपये शेती व घरावर घेतलेले कर्ज असल्याची माहिती त्यांचे मोठे बंधू मारोती गायकवाड यांनी दिली. 

याबाबत मंठा पोलिसात किंवा तहसिल कार्यालयात अद्याप माहिती नाही. मंठा तालुक्यात गेल्या तिन चारवर्षा पासून दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. गाव सोडून कामधंद्याच्या शोधत शहरात किंवा साखर कारखान्यावर ऊसतोड कामगार म्हणून गेले आहे. तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असून देखील शासनाने मंठा तालुक्यातील चार मंडळापैकी तळणी व पांगरी गोसावी ही दोन मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहे. तर मंठा व ढोकसाळ ही दोन मंडळ निकषात बसत नसल्याने दुष्काळग्रस्त यादीतून वगळले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com