नांदेड : कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 19 मे 2019

- गळफास घेऊन शेतकऱ्याने केली आत्महत्या.

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे एका तरूण शेतकऱ्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निमगाव (ता. हदगाव) शिवारात शनिवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आली.

निमगाव (ता. हदगाव) येथील शेतकरी अशोक रामधन चव्हाण (वय ४०) यांच्या शेतावर मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. त्यामुळे शेतातील उत्पादन घटल्याने ते कर्जबाजारी झाले. यावर्षीतरी शेतात उत्पादन चांगले निघेल या आशेने पुन्हा शेतात पेरणी केली. मात्र पाऊस कमी झाल्याने शेतातील पीके कोमेजून गेले. आता कर्जाची परतफेड कशी करायची आणि घरगाडा कसा चालवायचा या विवंचनेत सापडलेल्या अशोक चव्हाण या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १७) रात्री घरातून शेतावर जातो म्हणून निघून गेला. परंतु त्याने रात्रीच शेतातील बीबीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर मनाठा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

मृतदेह खाली उतरून हदगाव रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. या प्रकरणी रामसिंग कनीराम चव्हाण यांच्या माहितीवरुन मनाठा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तपास पोलिस नाईक तिडके हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Committed Suicide Due indebtedness in Nanded