Success Story: रंगीत ढोबळी मिरचीने केली किमया, तीन महिन्यांत शेतकऱ्याला मिळाले सात लाखांचे उत्पन्न

Colour Capsicum Producation In Ashti
Colour Capsicum Producation In Ashti

आष्टी (जि.बीड) : आष्टी तालुक्यातील नांदूर येथील प्रयोगशील शेतकरी संजय विधाते यांनी पॉलिहाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीची (कलर कॅप्सिकम) अर्धा एकर क्षेत्रावर लागवड करत केवळ तीन महिन्यांत सात लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. आष्टी तालुक्याच्या सरहद्दीवरील नांदूरमध्ये पाण्याचा कोणताही कायमस्वरूपी स्रोत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना हंगामी शेतीशिवाय पर्याय नाही. मात्र, या परिस्थितीवर मात करीत प्रगतीशील शेतकरी संजय विधाते यांनी प्रयोग म्हणून माळरानावर कलर कॅप्सिकम या रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली.

यासाठी त्यांना राज्य शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून आष्टी येथील कृषी विभागामार्फत हरितगृह पॉलिहाऊससाठी नऊ लाख रुपयांचे अनुदान मिळाले. यामधून त्यांनी कलर कॅप्सिकम या रंगीत ढोबळी मिरचीची लागवड करण्याचे नियोजन केले. जूनमध्ये २० गुंठे क्षेत्रामध्ये पाच हजार ६०० रोपे लाल व पिवळ्या रंगाच्या ढोबळी मिरचीची त्यांनी लावली. पहिल्याच वर्षी या कलर कॅप्सिकम मिरचीचे उत्पन्न सुरू झाले असून त्यांना तीन महिन्यांत सात लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.

अजून चार महिने मिरचीचे पीक हाती येणार आहे. यातून आणखी आठ ते दहा लाख रुपये मिळणार असल्याची माहिती श्री.विधाते यांनी दिली. ठिबक सिंचनाद्वारे दिवसातून फक्त पंधरा मिनिटे ते या पिकास पाणी सोडतात. इतर पिकापेक्षा अत्यंत अल्प प्रमाणात पाणी लागत असल्याने पाण्याचीही बचत होत आहे. शिवाय हरितगृहामध्ये पीक असल्याने मिरची पिकाचा दर्जाही उत्तम असून एक मिरची किमान २०० ते २५० ग्रॅम इतक्या वजनाची झाली आहे.

दर आठवड्याला साधारणपणे चाळीस हजार रुपये या मिरची विक्रीतून त्यांना मिळत असून आतापर्यंत दहा टन उत्पन्न झाले आहे. या रंगीत मिरचीचा वापर पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आदी मोठ्या शहरांमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये पिझ्झा-बर्गर, सूप, चायनीज पदार्थ बनविण्यासाठी तसेच उत्तर भारतात विवाह समारंभात होत आहे. यामुळे सध्या विधाते यांनी लागवड केलेली मिरचीला चांगली मागणी आहे. 


रंगीत ढोबळी मिरची लागवडीस हरितगृहामधील तापमान किमान १८ अंश सेल्सिअस व कमाल ३५ अंश सेल्सिअस आवश्यक असते. या पिकासाठी योग्य सापेक्ष आर्द्रता ५० ते ७५ टक्‍क्यांपर्यंत असली पाहिजे. हे प्रमाण हरितगृहामध्ये नियंत्रित करता येते. पर्यायाने हरितगृहातील मिरचीचा दर्जा चांगला राहतो. 
- घनश्याम सोनवणे ,कृषी पर्यवेक्षक, आष्टी. 

 
कृषी विभागाकडून राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून हरितगृह मिळाल्यानंतर त्यामध्ये मी कलर कॅप्सिकम या रंगीत ढोबळ्या मिरचीची लागवड केली. कमी पाण्यात येणारे हे पीक असून लागवडीनंतर अडीच महिन्यांपासून उत्पन्न सुरू होते. मला तीन महिन्यात सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून साधारणपणे एका सीजनमध्ये २० गुंठ्यामध्ये २० टनांचे उत्पन्न हाती येते. आणखी चार महिने हे मिरचीचे पीक येणार असून शेतकऱ्यांना उन्नतीकडे नेण्यासाठी हरितगृहामधील शेती फायदेशीर ठरत आहे. 
- संजय विधाते, प्रगतिशील शेतकरी, नांदूर 

 

 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com