'शेतकऱयांच्या कौशल्य विकासाने क्रांती घडेल'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

लातूर: आम्ही शेती करण्यास तयार आहोत, तसे आमचे प्रयत्नही सुरु आहेत, पण शेतीत नफा कमावताना खूप काबाडकष्ट करूनही फारसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे आज (बुधवार) मुख्यमंत्र्यानी सुरु केलेल्या शेतकऱ्यांच्या कौशल्य विकासाने शेतीत क्रांती घडेल, असा विश्वास नांदगावचे शेतकरी संतोष गर्जे यांनी व्यक्त केला.

लातूर: आम्ही शेती करण्यास तयार आहोत, तसे आमचे प्रयत्नही सुरु आहेत, पण शेतीत नफा कमावताना खूप काबाडकष्ट करूनही फारसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे आज (बुधवार) मुख्यमंत्र्यानी सुरु केलेल्या शेतकऱ्यांच्या कौशल्य विकासाने शेतीत क्रांती घडेल, असा विश्वास नांदगावचे शेतकरी संतोष गर्जे यांनी व्यक्त केला.

केंद शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत (पीएमकेव्हीवाय) महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीव्दारे (एमएसएसडीएस) शेतकरयांसाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान राबविण्यास आज लातूर जिल्ह्यात सुरुवात झाली. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाची राज्यासाठी सुरुवात करताना मुंबईतून थेट प्रेक्षपणाद्वारे संबोधन केले. त्यानंतर प्रशिक्षणाला उपस्थित शेतकऱयांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी शहरातील डीपी़डीसी सभागहात हरंगुळ मंडळातील दोनशेपेक्षा अधिक शेतकरी उपस्थित होते.

"मी गेली तीस वर्षांपासून फुलांची शेती करतोय. आता सेंद्रिय शेतीकडे वळलो आहे. त्यासाठीही ही नवीन गटशेतीची योजना अधिक लाभदायी आहे. मात्र सरकारने गटशेतीसाठी अनेक योजना दिल्या पाहिजे अन् त्या शेतकऱयांपर्यंत पोचल्या पाहिजे. त्यानंतर याने शेतीत क्रांती घडेल " अशी प्रतिक्रिया पाखरसांगवीच्या राम माळी यांनी व्यक्त केली. तर या प्रशिक्षणाला तब्बल साठ महिलांनी उपस्थिती लावली आहे. हरंगुळ खुर्दमधील महिलांनीही या गटशेतीद्वारे सेंद्रिय शेती सुरु केली आहे. यातील श्रीदेवी स्वामी म्हणाल्या की या गटशेतीने आम्हा महिलांना घरातील व्यवहारात पुन्हा निर्णायक भूमिका पार पाडण्याची संधी मिळणार आहे. तर यांच्या सहकारी रंजना पवार म्हणाल्या की एकत्र येऊन शेती केली तरच घरातील सर्व गरजा पूर्ण होणार आहेत. त्यासाठी घराघरातील व्यक्तींनी आणि गावातील नातेवाईकांनी या गटशेतीद्वारी एकत्र आले पाहिजे, आणि नेमके हेच या नवीन योजनेद्वारे होईल अशी मला आशा आहे. हरंगुळ खुर्दमधील मोहन पाटील म्हणाले की भाजीपाल पिकांसाठी ही गटशेती अधिक महत्वाची आहे. दररोज होणाऱया भावातील बदललाला योग्य तोंड दे्ण्याचा खरा उपया या योजनेत आहे, याची मला खात्री आहे.

तर नांदगावचे शेतकरी आनंद पाटील म्हणाले, ''या गटशेतीचा अधिक लाभ दुग्ध व्यवसायातही अधिक होणार आहे. शेतकऱयांची नवीन पिढी या दुग्ध व्यवसायात पुन्हा येण्यास् सुरुवात होईल अशी मला आशा आहे.

अशा विविध उत्स्फूर्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत होते. लातूर येथील प्रशिक्षणाला आज निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक सुदेश दहिवले, औशाचे कृषी अधिकारी एस. बी. देशमुख यांनी भेट देऊन उपस्थित शेतकऱयांनी नवनवीन काही शिकण्याची तयारी दाखविली, त्याबद्दल कौतुक केले. या वेळी मंडळाचे समन्वयक संदिप शिंदे, जिल्हा समन्वयक संभाजी रा. देशमुख उपस्थित होते.

Web Title: farmer issue and shetkari kaushal yojana at latur