‘किडनी घ्या; पण बियाणे, खत द्या’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

साहेब, तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पेरणीसाठी बियाणे, खतासाठी यंदा पैसेच नाहीत. माझी किडनी घ्या; पण खत, बियाणे द्या, असे निवेदन ताकतोडा (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील एका शेतकऱ्याने तहसीलदार जीवराज कांबळे यांना सोमवारी दिले.

केंद्रा बुद्रुक (जि. हिंगोली) - साहेब, तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पेरणीसाठी बियाणे, खतासाठी यंदा पैसेच नाहीत. माझी किडनी घ्या; पण खत, बियाणे द्या, असे निवेदन ताकतोडा (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील एका शेतकऱ्याने तहसीलदार जीवराज कांबळे यांना सोमवारी दिले.

सेनगाव तालुक्‍यात सलग तीन वर्षांपासून पुरेसा पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांनी पेरणी ते काढणीपर्यंत केलेला खर्चही वसूल झालेला नाही. दरवर्षी घटत्या शेती उत्पादनामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. दुष्काळाचा मुकाबला करताना जून निम्मा झाला आहे. मॉन्सूनचे आगमन व्हायचे आहे. नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे.

बियाणे, खते कशी घ्यावीत, असा अनेकांपुढे प्रश्‍न आहे. ताकतोडा येथील शेतकरी नामदेव पतंगे यांनी हीच कैफियत निवेदनातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते अल्पभूधारक शेतकरी असून, तीन वर्षांपासूनच्या नापिकीने ते त्रस्त आहेत. त्यामुळे यापूर्वी घेतलेले कर्ज फेडता आले नाही. याबाबत शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून काहीच मिळाले नाही. 

कोणत्याही पीकविमा, पीककर्ज, दुष्काळी अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. आता नव्या हंगामात पेरणीला बियाणे, खत खरेदीसाठी आर्थिक तरतूदच नाही. त्यामुळे किडनी घ्या; पण खत, बियाणे उपलब्ध करून द्या. अन्यथा, आत्मदहनाचा इशारा त्यांनी सेनगाव तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Kidney Seed Fertilizer Drought