तुम्हाला शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाही का?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - कचरा प्रक्रिया केंद्रामुळे आमचे काय हाल झाले आहेत, तुम्हाला थोडीतरी जाणीव आहे का? जरा शेतात जाऊन बघा... मदत करतोय म्हणजे, शेतकऱ्यांना तुम्हाला जगू द्यायचे नाही का? असा उद्विग्न सवाल चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहण्यासाठी गेलेल्या महापौर नंदकुमार घोडेले यांना शनिवारी (ता. २५) करण्यात आला. आम्ही सोबत आहोत, कचरा प्रक्रिया मशीन आल्यानंतर तुमचा त्रास कमी होईल, असे आश्‍वासन पुन्हा एकदा महापौरांनी दिले.

महापालिकेने हर्सूल, पडेगाव, चिकलठाणा, कांचनवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मशीन खरेदी, सिव्हिलची कामे करण्याच्या निविदा अंतिम करण्यात आल्या आहेत. चिकलठाणा येथे सिव्हिलच्या कामांना सुरवात करण्यात आली आहे. या कामाची महापौर श्री. घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेते विकास जैन, विरोधी पक्षनेता जमीर कादरी, गटनेते नासेर सिद्दिकी, भाऊसाहेब जगताप, नगरसेवक राजू शिंदे, माजी नगरसेवक रवी कावडे, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह इतरांनी पाहणी केली. केंद्रावर सुरू असलेली रेलचेल पाहून एका शेतकऱ्याने महापौरांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. कचरा प्रक्रिया केंद्रामुळे परिसरातील ओढ्याचे पाणी दूषित झाले आहे. उद्या विहिरीचे पाणी दूषित होईल, आम्ही काय करावे? असे शेतकऱ्याचे म्हणणे होते. महापौरांसह नगरसेवकांनी शेतकऱ्याची समजूत काढली. 

सहा शेड उभारणार 
प्रक्रिया केंद्रावर होणाऱ्या कामांची उपअभियंता एम. बी. काझी यांनी माहिती दिली. या ठिकाणी सहा शेड उभारले जाणार आहेत. हे काम आगामी सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर महापौरांनी किमान चार महिन्यांत काम पूर्ण करा, अशा सूचना केल्या. शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले. प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ओढ्याचे पाणी झाले दूषित 
कचरा प्रक्रिया केंद्राच्या शेजारी ओढा वाहतो. केंद्रातील कचऱ्याच्या ढिगातून निघालेले लिचेड या ओढ्याच्या पाण्यात मिसळले असून, हे पाणी आता लाल झाले आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाने कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे होणाऱ्या दूषित पाण्याविषयी महापालिकेकडे विचारणा केली आहे.

Web Title: Farmer Life Water pollution