शेतकरी संपावर जाणारच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

औरंगाबाद - आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा येत्या 1 जूनपासून संपावर जाणारच, असा निर्धार येथील किसान क्रांतीच्या राज्यव्यापी बैठकीत बुधवारी (ता. 17) करण्यात आला. शेतमालावर सर्वकाही अवलंबून असतानाही त्याच्या कष्टाला दाद न देणाऱ्या राज्यकर्त्यांना धडा शिकविण्यासाठी दुधासह भाजीपाला, अन्नधान्य अशा वस्तू गावातून बाहेर काढायच्याच नाहीत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

औरंगाबाद - आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा येत्या 1 जूनपासून संपावर जाणारच, असा निर्धार येथील किसान क्रांतीच्या राज्यव्यापी बैठकीत बुधवारी (ता. 17) करण्यात आला. शेतमालावर सर्वकाही अवलंबून असतानाही त्याच्या कष्टाला दाद न देणाऱ्या राज्यकर्त्यांना धडा शिकविण्यासाठी दुधासह भाजीपाला, अन्नधान्य अशा वस्तू गावातून बाहेर काढायच्याच नाहीत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

राज्यातील वीसहून अधिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्‍कासाठी लढणाऱ्या संघटना, शेतकऱ्यांच्या संघटना, पक्ष यांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विधिज्ञांच्या उपस्थितीत येथील बीड बासपास रोडवरील पटेल लॉनवर बैठक झाली. जवळपास पाच तास चाललेल्या या बैठकीत शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी प्रतिनिधींनी आपापली भूमिका मांडली. यापूर्वी, किसान क्रांतीच्या माध्यमातून एकवटलेल्या सर्वांची पुणे येथे 10 मे रोजी पहिली राज्यव्यापी बैठक पार पडली होती. या बैठकीत संपावर जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याचे पुढील नियोजन, आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने दुसरी राज्यव्यापी येथे पार पडली.
या बैठकीस औरंगाबाद, जालना, बीड, नाशिक, सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जळगाव, बुलडाणा, नगर, वाशीम यासह जवळपास वीसहून अधिक जिल्ह्यांतील शेतकरी, सामाजिक संघटना, विविध पक्षांचे पदाधिकारी आदींनी सहभाग नोंदवला. या बैठकीत तीन महत्त्वपूर्ण ठराव घेऊन काही व्यक्‍तींचा राज्य समन्वय समितीमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती किसान क्रांतीचे राज्य समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी स्वराज्य अभियानचे सुभाष लोमटे, डोणगाव येथील धनजंय धोर्डे यांच्यासह अन्य मंडळी उपस्थित होती.

बैठकीतील महत्त्वाचे तीन ठराव
1 जूनपासूनच्या संपावर किसान क्रांती ठाम
2 आधी कर्जमाफीचा निर्णय घ्या, तरच चर्चा करा
3 शहरांचा दूध, भाजीपाला, बाजारापेठा बंद करणार

मुख्यमंत्री, चर्चा करणाऱ्यांचा निषेध
पुणतांबा (जि. नगर) येथील काही शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करीत हा संप मागे घेतल्याचे मंगळवारी (ता. 16) जाहीर केले होते. विशेष म्हणजे, पुणतांबा येथील किसान क्रांतीच्या सहा व्यक्‍तीही राज्यव्यापी बैठकीस उपस्थित होते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना काहीही माहिती न देत मुख्यमंत्र्यांशी परस्पर चर्चा करणाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. पुणतांबा पंचक्रोशीतून जवळपास 40 ग्रामसभांनी तसे ठराव घेतले. मुख्यंमत्र्यांना चर्चा करायची होती तर मग 40 गावांतून एक असे प्रतिनिधी का बोलावले नाही, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. शेतकरी संपावर जाण्यास तयार असल्याचे पुणतांबा येथील अशोक धनवटे, धनंजय जाधव, सुधाकर जाधव, गणपतराव वाघ, प्रा. एस. आर. बखळे, सर्जेराव जाधव यांनी जाहीर केले.

शेतकरी एकत्र आले तर मोठा लढा उभा करू शकतात, याची सरकारला भीती आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री फूट पाडण्याचा कट आखत आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. शेतकऱ्यांकडे केले जाणारे दुर्लक्ष सरकारला परवडणार नाही.
- विजय काकडे, राज्य समन्वयक किसान क्रांती

Web Title: farmer on strike