नांदेड, परभणीत तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

नांदेड - नापिकी, कर्जामुळे तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात परभणीतील दोन, तर नांदेड जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.

नांदेड - नापिकी, कर्जामुळे तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात परभणीतील दोन, तर नांदेड जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.

इमारतीवरून मारली उडी
पूर्णा - देगाव (ता. पूर्णा) येथील शेतकरी अतिष विश्वनाथ वळसे (वय ३२) यांनी गुरुवारी (ता. पाच) दुपारी पूर्णा नगरपरिषदेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांची सुरवाडी (ता. पूर्णा) शिवारात तीन एकर शेत असून बॅंकेचे पीककर्ज आहे. सततच्या नापिकीमुळे कर्जफेड करता आली नाही. सहा महिन्यांपासून त्यांनी शेती विक्रीस काढली होती. ती कोणीही घेत नसल्याने ते विवंचनेत होते, असे नातेवाइकांनी सांगितले. पूर्णा येथील जुना मोंढा भागात असलेल्या नगरपरिषदेच्या इमारतीवरून त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

नापिकी, कर्जामुळे आत्महत्या
सेलू - म्हाळसापूर (ता. सेलू) येथील शेतकरी सुदाम बापूराव जाधव (वय ३२) यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. ५) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. त्यांनी शेतीसाठी बॅंक, खासगी सावकाराकडून कर्ज काढले होते. नापिकीमुळे कर्जफेडीसह अन्य आर्थिक व्यवहार अशक्‍य झाले. त्यामुळे ते कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी नाशिकला गेले होते. गावाकडची शेती कुणाला तरी कसायला देण्याच्या उद्देशाने ते गावाकडे आले होते. काल रात्री उशिरा जेवण करून ते घरी झोपी गेले. आज सकाळी उशिरापर्यंत ते न उठल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने आईने खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी ते गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. सेलू पोलिसांत घटनेची नोंद झाली असून शंकर पांढरे तपास करीत आहेत.

विष घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
खडकी (ता. हिमायतनगर) येथील शेतकरी जयवंत नारायण शिंदे (वय ४०) यांनी विष घेऊन आत्महत्या केली. 

सततच्या नापिकीमुळे वेळेवर कर्जफेड होत नसल्याच्या विवंचनेतून त्यांनी रविवारी (ता. एक) विष घेतले. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हिमायतनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली. निरीक्षक विठ्ठल चव्हाण तपास करीत आहेत.

Web Title: farmer suicide