शेतीत दम नाही म्हणत शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

शेतकरी जाधव यांनी ३० एप्रिलच्या रात्री शेतावर झोपण्यास गेल्यानंतर विष घेतले. मध्यरात्री बारा वाजेदरम्यान अवस्थ वाटू लागल्याने घरी येऊन पत्नीस उठविले आणि शेतीत काही दम नाही म्हणत आपण विष घेतल्याचे सांगितले.

औरंगाबाद - नापिकी, अवर्षणप्रवण स्थिती, उत्पादित शेतमालाला मिळणार अपुरा भाव आदी गोष्टींना कंटाळून वावना (ता.फुलंब्री)येथील शेषराव भावडू जाधव (वय ५५) या शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. 

शेतकरी जाधव यांनी ३० एप्रिलच्या रात्री शेतावर झोपण्यास गेल्यानंतर विष घेतले. मध्यरात्री बारा वाजेदरम्यान अवस्थ वाटू लागल्याने घरी येऊन पत्नीस उठविले आणि शेतीत काही दम नाही म्हणत आपण विष घेतल्याचे सांगितले. या अवस्थेत शेतकरी जाधव यांना फुलंब्री रुग्णालयात दाखल करण्यात येऊन प्रकृती खालावत चालल्याने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र एक मे रोजी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन मे ला त्यांचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. जाधव हे मागील सहा महिन्यांपासून चिंतेत होते. त्यांना अडीच एकर कोरडवाहू शेती असून यातून त्यांनी दोन मुलींची लग्ने केल्याचे जाधव यांच्या पुतण्या योगेश जाधव यांनी सांगितले. 

पुढारी, अधिकाऱ्यांनी फिरविली पाठ
ही घटना होऊन दोन दिवस झाले तरी जाधव यांच्या घरी एकही पुढारी, नेता, अधिकाऱ्याने भेट दिली नाही. विशेष म्हणजे ही घटना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदार संघात घडली आहे. त्यांचे एकही कार्यकर्ते अजून फिरकले नसल्याचे सांगण्यात आले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Farmer Suicide in Aurangabad