दर दोन दिवसांना पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

औरंगाबाद  - नापिकी, बिनभरवशाची शेती आणि कर्जाचा डोंगर यासारख्या काही प्रमुख कारणांनी मराठवाड्यात गेल्या 90 दिवसांत तब्बल 216 शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलत जीवन संपविले. दर दोन दिवसांना पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारी यंत्रणेने आतापर्यंत 126 शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरविल्या व कुटुंबाला एक लाखांची मदत दिली गेली.

कर्जाचा वाढता डोंगर, नापिकी, अत्यल्प उत्पन्न आणि सावकारी तगादा या कारणांनी मराठवाड्यातील 216 शेतकऱ्यांनी या वर्षाच्या सुरवातीला जीवन संपविले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची की नाही यावर सरकारतर्फे ठोस पावले उचलली जात नसताना दुसरीकडे दर दोन दिवसांत पाच शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दुर्दैवी चित्र मराठवाड्यात पाहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांत बीड जिल्ह्यात सर्वाधिक 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापाठोपाठ नांदेड 38, उस्मानाबाद 37, औरंगाबाद 30, जालना 21, परभणी 24, हिंगोली 14, तर लातूर जिल्ह्यातील 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून एका लाखाची मदत करण्यात येते. त्या अनुषंगाने गेल्या तीन महिन्यांत 216 प्रकरणांपैकी 126 शेतकरी आत्महत्येची प्रकरणे अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आली असून, 29 अपात्र ठरविण्यात आली आहेत.

Web Title: farmer suicide in aurangabad