बीड जिल्ह्यात मागील वर्षात 219 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बीड जिल्ह्यात मागील वर्षात 219 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

2015 च्या तुलनेत आत्महत्यांचे प्रमाण झाले कमी
बीड - जिल्ह्यात 2015 या वर्षात तब्बल 301 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, गतवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आकडा कमी झाला असला तरी दमदार पाऊस होऊनही वर्षभरात सुमारे 219 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले आहे.

गतवर्षीच्या पूर्वार्धात आत्महत्यांची नोंद जास्त असली तरी पावसाळ्यानंतर हे प्रमाण कमी झाले आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सततचा दुष्काळ, नापिकी, घटलेले उत्पादन आणि कर्जबाजारीपणामुळे आर्थिक गणित बिघडल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जिल्ह्यात गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर अखेरपर्यंत 219 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे.

मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर जिल्ह्यांतही शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ही 666 मिलिमीटर आहे. मात्र पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीच्या निम्माही पाऊस होत नव्हता. त्यात पीकवाढीच्या काळात पावसाचा मोठा खंड पडत असल्याने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, खरीप ज्वारी यांच्या उत्पादनात मोठी तूट आली. याशिवाय ज्वारी, गहू, हरभरा यांसारखे पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्यांचा मार्ग स्वीकारला.

उत्पादन वाढल्याचा आणि प्रबोधनाचा सकारात्मक परिणाम
जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामाचे मिळून एकूण 9 लाख 27 हजार 430 हेक्‍टर इतके क्षेत्र लागवडी खालील आहे. यापैकी दोन्ही हंगामांत मिळून 8 लाख 29 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली असून जिल्ह्यात पीक कापणी प्रयोगावरून खरीप पिकांच्या सरासरी उत्पादनात गतवर्षीपेक्षा वाढ झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. जिल्ह्यात 1403 महसुली गावे असून 2015 मध्ये जिल्ह्यातील सर्वच म्हणजे 1403 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली होती. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्याची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा कमीच होती. मात्र यंदा जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसामुळे उत्पादकता वाढली असून जिल्ह्याची पैसेवारी ही तीन वर्षांनंतर प्रथमच 50 पैशांपेक्षा वर आली आहे. महसूल प्रशासनाच्या अहवालानुसार यावर्षीची अंतिम पैसेवारी सरासरी 58.24 पैसे इतकी आली आहे. पीकविमा, दुष्काळी अनुदान या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडीफार मदत झाली. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण लक्षात घेऊन अनेक संस्था शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या. अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्यासह भैय्यू महाराजांच्या सूर्योदय प्रतिष्ठानसह शिवसेनेने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत केली. शेतकऱ्यांना "आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही निराश होऊ नका' हा संदेश दिला गेला. या सर्वांचा परिणाम म्हणून शेतकरी आत्महत्येचा आकडा खाली आला आहे.

162 प्रकरणे शासकीय मदतीसाठी ठरली पात्र
जिल्ह्यात 219 शेतकऱ्यांच्या आत्महत्या गतवर्षी झाल्या असून यातील 162 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे सरकारी मदतीस पात्र ठरली आहेत. आत्महत्येची 46 प्रकरणे अपात्र ठरली असून 11 प्रकरणे चौकशी स्तरावर आहेत. 2015 या वर्षात तब्बल 301 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. यातील अर्ध्यापेक्षा अधिक म्हणजेच 215 प्रकरणे सरकारी मदतीस पात्र ठरली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com