हिंगोलीत शेतकऱ्याने कवटाळले मृत्यूला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

मधुकर बबनराव चव्हाण (वय ३५, रा. वाघी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मयत मधुकर चव्हाण यांना वाघी शिवारात दोन एकर शेती आहे. मात्र, सततच्या नापिकीमुळे कुटुबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत होता.

कुरुंदा/ शिरडशहापूर (जि. हिंगोली) : सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्‍महत्या केल्याची घटना वाघी (ता. वसमत) येथे गुरुवारी (ता. २१) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

मधुकर बबनराव चव्हाण (वय ३५, रा. वाघी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मयत मधुकर चव्हाण यांना वाघी शिवारात दोन एकर शेती आहे. मात्र, सततच्या नापिकीमुळे कुटुबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत होता.

हेही वाचा संतापजजक : प्रेमसंबंधात अडथळा; बारा वर्षीय मुलीला क्रुरतेने संपवले

दोन मुलीच्या लग्नाची चिंता

 त्यातच त्यांना दोन मुलीच्या लग्नाची चिंता होती. यातूनच गुरुवारी (ता. २१) रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी गळफास लावून आत्‍महत्या केली. या बाबत सदाशिव बाबूराव चव्हाण यांच्या खबरीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात शुक्रवारी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली. 

पोलिसांची घटनास्थळी भेट

सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रकाश नेव्हल, श्री. भिसे तपास करीत आहेत. दरम्यान, त्‍यांच्या पश्चात आई, पत्‍नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

आखाड्यावरील बैलजोडी चोरीला

हिंगोली : तालुक्‍यातील बासंबा येथील एका आखाड्यावरील बैलजोडी चोरून नेल्याप्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २१) गुन्हा दाखल झाला आहे. बासंबा येथील शेतातील आखाड्यावर ९० हजार रुपये किमतीचे बांधलेले दोन बैल चोरट्यांनी सोमवारी (ता. १८) रात्री चोरून नेले. त्‍यानंतर दुसऱ्या दिवशी बैलांचा शोध घेतला. मात्र, सापडले नाहीत. या बाबत सावता बळिराम ठेंगडे यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बस आगारात काळ्या फिती लावून कामकाज

वसमत : शासनाने लॉकडाउनचा फायदा घेऊन कारखाना अधिनियमामधील तरतुदीचे उल्‍लंघन करून दैनंदिन कामाच्या तासात वाढ करून बारा तास करण्याच्या निर्णय घेतल्याने येथील बस आगारातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २२) काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.

सरकार घेतेय लॉकडाउनचा फायदा 

महाराष्ट्र , उत्तरप्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उडिसा, राजस्थान, बिहार आणि पंजाब या राज्यांतील सरकारने लॉकडाउनचा फायदा घेऊन कारखाना अधिनियम १९४८ मधील तरतुदींचे उल्लंघन करून दैनंदिन कामाचे तास आठवरून १२ तास करण्याचा निर्णय घेतला आहे. 

येथे क्लिक कराहिंगोली बाजारपेठेतील बहुतांश व्यवहार सुरू

कामाचे आठ तास करावेत

त्यामुळे केंद्र व राज्य सरकार यांनी कामगार कायदे स्थगित करण्याचे तसेच कामगार कायदे बदलण्याचा निर्णय रद्द करावा, कामाचे तास १२ वरून पूर्वीप्रमाणे आठ तास करावेत, लॉकडाउन कालावधीतील संपूर्ण वेतन कामगारांना अदा करण्यात यावे, सर्व गरजूंना रेशन दुकानांतून स्वस्त अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा आदी मागण्या करीत वसमत आगार एसटी इंटकच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. 

संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा समावेश

यात महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) वसमत आगाराचे सचिव गणेशराव पडोळे, कार्याध्यक्ष गंगाधर साखरे, महिला संघटक उज्ज्वला झगडे, किरण कडतन, प्रकाश भंडारे, कैलास नरोटे, उमेश कापुसकरी, मारोती चिटकलवार, यशोदीप अटकोरे, पुरभाजी कदम, राजू सूर्यवंशी, ज्ञानेश्वर काठमोडे, रेणुका गिरी, विजय बीडकर, प्रल्हाद स्वामी, महादू गायकवाड, रमेश करवंदे , शिवचंद्र पत्रकर आदींनी सहभाग घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer suicide in Hingoli Hingoli news