आयुष्याचा सातबारा होतोय कोरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

गेल्या १६ महिन्यांत शेतकरी आत्महत्येचे शतक

जालना - शेतकऱ्यांना डोक्‍यावर असलेल्या कर्जाच्या डोंगराचा भार घेऊन जगणे कठीण झाल्याचे विदारक चित्र आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार मागील सोळा महिन्यांमध्ये जिल्ह्यातील ९९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्याच पंधरवड्यात घनसावंगी तालुक्‍यात पाच शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. याबाबत प्रशासकीय पातळीवर नोंदीची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचा प्रत्यक्ष आकडा हा शंभरीपार झालेला आहे. आत्महत्यांचे सत्र सुरू असूनही कर्जमाफीसंदर्भात राज्य शासनाच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. 

दुष्काळ, अवकाळी आणि नापिकी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात यंदा आलेल्या पिकांनाही योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे यंदाही आर्थिक संकट शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बॅंकांकडून घेतलेल्या कर्जासह खासगी कर्जाच्या परतफेडीची चिंता आहे. 

जानेवारी २०१६ ते एप्रिल २०१७ या सोळा महिन्यांच्या कालावधीमध्ये शासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ९९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील ८३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. तर २०१६ मधील १३ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासकीय नियमांच्या डोंगरामुळे ही मदत मिळू शकली नाही. तसेच २०१७ मधील तीन प्रकरणे प्रलंबित आहेत.

जानेवारी ते एप्रिल २०१७ या चार महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये २३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.

दुष्काळ, अवकाळी, नापिकी, पिकांना न मिळणारा योग्य हमी भाव आणि कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी चिंतातुर आहेत. त्यामुळे आता तरी शासनाने या आत्महत्या थांबण्यासाठी ठोस पाऊले उचलून कर्जमाफीसह शेती मालाला योग्य हमीभाव देणे गरजेचे आहे.

मदतीसाठी नियमांचा डोंगर
गतवर्षी जिल्ह्यामध्ये ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ६३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. आर्थिक मदतीची ही एकूण रक्कम ६३ लाख होती. तर नियमांच्या डोंगरामुळे १३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले.

Web Title: farmer suicide in jalana