कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

फुलंब्री - बोरगाव अर्ज (ता. फुलंब्री) येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.11) घडली आहे. रामेश्‍वर दावल बलांडे (वय 55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

फुलंब्री - बोरगाव अर्ज (ता. फुलंब्री) येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.11) घडली आहे. रामेश्‍वर दावल बलांडे (वय 55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बलांडे मंगळवारी (ता.11) सकाळी साडेतीन ते चारच्या दरम्यान नेहमीप्रमाणे शेतात जनावरांना चारापाणी करण्यासाठी घरातून बाहेर पडले. शेतात गेल्यानंतर त्यांनी कपाशीवरील कीटकनाशक औषध प्राशन केले. बलांडे हे घरी का परतले नाही म्हणून त्यांचा मुलगा व पत्नी यांनी शेत गाठले. त्या वेळी सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकरी गोळा झाले. त्यांनी बलांडे यांना खासगी वाहनाने सकाळी औरंगाबाद येथे घाटीत दाखल केले.

त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्यावर बुधवार (ता.12) दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बलांडे यांना बोरगाव अर्ज परिसरात दोन एकर शेतजमीन आहे. या शेतीवर त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे एक लाख रुपये कर्ज काढलेले होते. या कर्जासह एका पतसंस्थेचे व खासगी लोकांचे उसने पैसे असे सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज त्यांच्यावर होते. कर्ज कोणत्या उत्पन्नातून फेडायचे या चिंतेने ते मानसिक तणावाखाली घरात कोणालाही काही न बोलता गेल्या महिन्याभरापासून वावरत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणी वडोद बाजार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: farmer suicide by loan