मराठवाड्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

कसबे तडवळे येथील दिलीप शंकर ढवळे (वय 55) या शेतकऱ्याने गुरुवारी (ता. 11) रात्री गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत उस्मानाबाद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले आहे, तर ढवळे यांच्या आत्महत्येस बॅंक जबाबदार असल्याचे स्पष्टीकरण ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले आहे. दरम्यान, या चिठ्ठीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

कसबे तडवळे (ता. उस्मानाबाद) - कसबे तडवळे येथील दिलीप शंकर ढवळे (वय 55) या शेतकऱ्याने गुरुवारी (ता. 11) रात्री गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत उस्मानाबाद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले आहे, तर ढवळे यांच्या आत्महत्येस बॅंक जबाबदार असल्याचे स्पष्टीकरण ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले आहे. दरम्यान, या चिठ्ठीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

शेतकरी ढवळे हे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष, तेरणा सहकारी साखर कारखान्यात कंत्राटदार होते. त्यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. ढोकी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली. पोलिस पंचनाम्यावेळी मृतदेह झाडावरून खाली उतरवीत असताना ढवळे यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. तीत आर्थिक विवंचनेसह ओमप्रकाश राजेनिंबाळकर व विजय दंडनाईक हे आत्महत्येस जबाबदार असल्याचा उल्लेख आहे. "बॅंकेत सातबारा गहाण ठेवून चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास या दोघांनी भाग पाडले. त्या जमिनीचा तीनवेळा लिलाव पुकारला व माझी मानहानी केली. सततचा दुष्काळ आणि या फसवणुकीमुळे माझे व कुटुंबाचे खूप हाल झाले,' असेही चिठ्ठीत म्हटले आहे.

तेरणा सहकारी साखर कारखान्यात कंत्राटदार असलेले ढवळे यांना त्यांची रक्‍कम मिळाली नव्हती. याबाबत अडचण मांडण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भेटण्यास गेलो असता, राजेनिंबाळकर यांनी भेटू दिले नाही, असेही ढवळे यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक धनू चव्हाण तपास करीत आहेत.

दरम्यान, ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मात्र ढवळेंच्या आत्महत्येला वसंतदादा नागरी सहकारी बॅंक जबाबदार असल्याचे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Suicide in Marathwada