नांदेड: कर्जबाजारी शेतकरी महिलेची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
रविवार, 8 एप्रिल 2018

कंधार तालुक्यातील हिंदोळा येथे राहणाऱ्या कमलबाई गणपती जाधव (वय ४५) यांचे उदरनिर्वाहाचे साधन फक्त शेती होती. या शेतीत त्यांचे कुटूंब राबराब राबत असे. परंतु मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात नापिकी होत होती. याचा फटका या गरीब जाधव कुटूंबालाही बसला.

नांदेड : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि गंभीर आजार या तिहेरी संकटात सापडलेल्या एका शेतकरी महिलेनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना कंधार तालुक्यातील हिंदोळा येथे शनिवारी (ता. सात) घडली. 

कंधार तालुक्यातील हिंदोळा येथे राहणाऱ्या कमलबाई गणपती जाधव (वय ४५) यांचे उदरनिर्वाहाचे साधन फक्त शेती होती. या शेतीत त्यांचे कुटूंब राबराब राबत असे. परंतु मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात नापिकी होत होती. याचा फटका या गरीब जाधव कुटूंबालाही बसला. संसाराचा गाडा चालविण्यासाठी त्यानी महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा कापशी शाखेतून २५ हजार रुपये कर्ज काढले. परंतु हाताला काम व शेतातील उत्पन्न घटल्याने कर्जाचा डोंगर वाढला.

या दुहेरी संकटात सापडलेल्या कमलाबाईला एका गंभीर आजाराने ग्रासले. अगोदरच खचुन गेले हे कुटूंब त्यांच्या आजारावर उपचार करु शकत नव्हते. या तिहेरी संकटात सापडलेल्या कमलबाईने हिंदोळा शिवारात असलेल्या एका विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नागोराव गणपती जाधव यांच्या माहितीवरुन उस्माननगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. काथवटे हे करीत आहेत. मयत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा व दोन मुली असा परिवार असल्याचे श्री. काथवटे यांनी सांगितले. 

Web Title: farmer suicide in Nanded