'विकत घ्या, विकत घ्या, आमचे गाव विकत घ्या'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

ताकतोडा येथील गावकऱ्यांनी पीकविमा व नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे "गाव विक्री' आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रविवारी बैलगाडीसह गुरांना सहभागी करून "विकत घ्या, विकत घ्या, आमचे गाव विकत घ्या', अशा घोषणा देत आंदोलन केले.

ताकतोडा ग्रामस्थांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच
सेनगाव (जि. हिंगोली) - ताकतोडा येथील गावकऱ्यांनी पीकविमा व नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे "गाव विक्री' आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रविवारी बैलगाडीसह गुरांना सहभागी करून "विकत घ्या, विकत घ्या, आमचे गाव विकत घ्या', अशा घोषणा देत आंदोलन केले.

ताकतोडा येथे शुक्रवारपासून ग्रामस्थांनी गाव विक्रीचे आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व सेनगावचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी ताकतोडा गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला; परंतु गावकऱ्यांचे त्यावर समाधान झाले नाही. त्यामुळे सलग चौथ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते. ताकतोडा येथील साडेतीन हजार लोकसंख्या असून, तीन हजार एकर शेती उपलब्ध आहे.

अद्यापही शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नाही. गावात तीनशे खातेदार असून, त्यांना नवीन पीककर्जाचा लाभ मिळालेला नाही.

त्यामुळे हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे. शुक्रवारपासून गावातील शासकीय कार्यालये व दुकाने बंद आहेत. रविवारी ग्रामस्थांनी बैलगाड्या आणि गुराढोरांनाही आंदोलनात सामील केले होते. या वेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घोषणाही देण्यात आल्या. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Taktoda Village Selling Agitation Crop Insurance Bank Loan