'शेतकऱ्यांचे रखडलेले रोहित्र तत्काळ दुरुस्त करा'

नवनाथ इधाटे
गुरुवार, 17 मे 2018

लोंबकळणाऱ्या विद्युत तारेला शॉक लागून काही अनुचित प्रकार घडल्यास याला महावितरणचे अधिकारी जबाबदार राहील. आणि संभाजी ब्रिगेड संबंधित अधिकाऱ्यावर पोलिसात गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे रखडलेले रोहित्र व लोंबकळनाऱ्या विद्युत ताराची तत्काळ दुरुस्ती करावी असे निवेदन महावितरणचे अभियंता अरुण गायकवाड यांना दिले आहे.

फुलंब्री : सध्या उन्हाळा सुरु असून खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रोहीत्राचे काम रखडलेले आहे. सदरील रखडलेल्या रोहीत्राचे काम तत्काळ सुरु करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने संभाजी ब्रिगेड आंदोलन करणार असल्याचा इशारा बुधवारी (ता.16) निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सदरील निवेदनात म्हटले आहे कि, फुलंब्री तालुक्यात 2017-18 या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या एकाही रोहीत्राचे काम झालेले नाही. तसेच सिंगल फ्युजचे सुद्धा काम करण्यात आलेले नाही. पंडित दीनदयाळ योजना फक्त नावापुरतीच उरली असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ गजर दाखविण्याचे काम केले जात आहे. फुलंब्री तालुक्यात 150 नवीन रोहीत्राचे काम रखडलेले आहे. याबाबत शेतकरी वारंवार महावितरण कार्यालयात चकरा मारीत आहे. मात्र तरीही यावर कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नाही. त्याचबरोबर तालुक्यात बहुतांश ठिकाणी विद्युत विजेच्या तारा लोंबकळत आहे. शेतकऱ्यांच्या हाताला विद्युत तारा लागत असल्याने शेतीची कामे करणे कसरतीचे ठरत आहे.

लोंबकळणाऱ्या विद्युत तारेला शॉक लागून काही अनुचित प्रकार घडल्यास याला महावितरणचे अधिकारी जबाबदार राहील. आणि संभाजी ब्रिगेड संबंधित अधिकाऱ्यावर पोलिसात गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे रखडलेले रोहित्र व लोंबकळनाऱ्या विद्युत ताराची तत्काळ दुरुस्ती करावी असे निवेदन महावितरणचे अभियंता अरुण गायकवाड यांना दिले आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष योगेश पाथ्रीकर, उपाध्यक्ष रोहित तरटे, प्रसिद्धी प्रमुख वसंत पाथ्रीकर, तातेराव तरटे, अमोल तरटे, नितीन मगर, संतोष गायकवाड, रावसाहेब गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, बाळू गायकवाड, रंगनाथ गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: farmer transformer issue in Phulambri