शेतकऱ्याला सुटाबुटात काम करताना पाहायचंय

आदित्य वाघमारे
गुरुवार, 16 मे 2019

गावात प्रयोग होतात याचे उदाहरण...
मुलांना नोकरी करण्याची इच्छा असते; पण मालक होण्याचे त्यांच्या मनात नसते. आपल्या गावाकडेही यशस्वी प्रयोग करता येतात, याचे उत्तम उदाहरण नामदेव आणेराव यांनी घालून दिले आहे. त्यांची इच्छा आणि जिद्द गावाला पुढे नेणारी ठरणार असल्याची अपेक्षा प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, ग्राहकांची गरज जे ओळखतात, त्यांची वाटचाल समृद्धीकडेच होते, असे गौरवोद्‌गार सुनील रायठठ्ठा यांनी काढले.

औरंगाबाद - शिकून दुसऱ्याकडे नोकरी करण्यात अनेकजण धन्यता मानतात. मात्र, पिंपळनेर (ता. बीड) येथील अल्पशिक्षित शेतकरीपुत्राने स्वतःचा कारखाना उभारण्याचा ‘करिष्मा’ केला आहे. ‘समजदार ॲग्रो इक्विपमेंट’ या शेतकरी उत्पादन कारखान्याचा प्रारंभ बुधवारी (ता. १५) थाटात झाला. आपल्याला शेतकऱ्याला सुटाबुटात काम करताना पाहायचे आहे, अशी भावुक प्रतिक्रिया नामदेव आणेराव यांनी या वेळी दिली.

शेतकरीपुत्र नामदेव आणेराव यांनी शेत नांगरणारे ‘श्रीकांत’ नावाचे यंत्र तयार केले आणि त्यावर तीन वर्षे प्रयोग केले. याचे त्यांनी ‘पेटंट’ही मिळविले.

आता हे यंत्र व्यावसायिक स्वरूपात तयार करण्यासाठी नामदेव आणेराव सज्ज झाले आहेत. बैलजोडीच्या साहाय्याने जेवढी कामे एका शेतकऱ्याला करावी लागतात, तेवढीच कामे चारा-पाण्याच्या खर्चापेक्षा स्वस्तात करणारे यंत्र नामदेव आणेराव यांनी तयार केले आहे. वडील शेतात काम करीत असताना मनुष्यबळाअभावी थांबणाऱ्या कामातून ही संकल्पना आपल्याला सुचल्याचे नामदेव यांनी सांगितले. या कारखान्यात २२ जणांना रोजगार मिळाला असून, यंत्रेही गावातील तरुण चालविणार असल्याचा आपल्याला आनंद आहे. या कारखान्याचे उद्‌घाटन ‘मॅजिक’चे संचालक प्रसाद कोकीळ, सुनील रायठठ्ठा यांच्या हस्ते करण्यात आले. 

ग्राहकालाच केले भागीदार
ग्राहकाला भागिदारी देण्याचे काम नामदेव आणेराव यांनी केले. त्यांना कंपनीचे शेअर्स दिले आणि त्यातून पैसा उभा केला. त्यांना बुधवारी शेअर प्रमाणपत्र देण्यात आले. यातून उभा राहिलेला पैसा घेऊन वेल्डिंगच्या कामात पारंगत असलेले नामदेव यांनी आपल्या कंपनीचे शेड उभे करून कामाची सुरवात केली आहे. सध्या हातावर २५ यंत्रांची ऑर्डर असून, ती जुलैअखेरीस पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मॅजिक’चा भक्कम पाठिंबा 
‘सीएमआयए’च्या मराठवाडा ॲक्‍सिलरेटर फॉर ग्रोथ ॲण्ड इन्क्‍युबेशन कौन्सील (मॅजिक) या संस्थेने गेल्या तीन वर्षांपासून या उद्योग उभारणीसाठी आणेराव यांना मदत केली आहे. संकल्पनेला बळ, आर्थिक रसद, कारखाना चालविण्याच्या तंत्राविषयीचे मार्गदर्शन मेंटॉर प्रसाद कोकीळ, सुनील रायठठ्ठा, मिलिंद कंक, आशिष गर्दे आदींनी त्यांना केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Work Samajdar Agro Equipment Namdev Aanerao