पिकविम्याची कागदपत्रे जमविण्यातच शेतकऱ्यांची दमछाक

तानाजी जाधवर
सोमवार, 9 जुलै 2018

सोमवारपासून (ता. 9) सकाळपासून ही वेबसाईट बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेकांना आज प्रतीक्षा करावी लागली. प्रधानमंत्री पिकविमा योजनेत खरीप हंगामामध्ये पिकविमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै असून, बिगर कर्जदारासाठी 24 तारीख अंतिम असणार आहे.

उस्मानाबाद - खरीप हंगामासाठी पिकविमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमा काढण्याकरिता शेतकऱ्यांना सातबारा, आठ 'अ' सह विविध कागदपत्रांची गरज असून, ही कागदपत्रे मिळविण्यातच शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. त्यातच ऑनलाईन पिकविमा भरण्याचा निर्णय घेतल्याने अडचणीमध्ये भर पडल्याचे चित्र आहे.

सोमवारपासून (ता. 9) सकाळपासून ही वेबसाईट बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेकांना आज प्रतीक्षा करावी लागली. प्रधानमंत्री पिकविमा योजनेत खरीप हंगामामध्ये पिकविमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै असून, बिगर कर्जदारासाठी 24 तारीख अंतिम असणार आहे. गेल्या वर्षीपासून पिकविमा भरण्याच्या पद्धतीत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. पिकपेरा प्रमाणपत्रासोबतच विमा भरण्यासाठी ऑनलाईन सातबारा, आठ 'अ', आधारकार्ड, बँक पासबुक, बँक खाते संलग्नित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

केंद्रावरच ऑनलाइन पद्धतीने भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऑनलाइन पिक विमा भरण्याच्या सोमवारच्या दिवशी परिसरातील शेतकरी केंद्राचा शोध घेत होते, शोध घेतल्यानंतर तिथे वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न केला तर ती साईटच उघडत नसल्याचे समोर आले. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. केंद्राचा ताळमेळ बसत नसल्याने व ऑनलाइन लिंक मिळत नसल्याने शेतकरी परत पिकविमा भरण्यापासून वंचित राहतात का? अशी स्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामासाठी पंतप्रधान पिकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना मुदत दिली आहे. पण वेबसाईटची परिस्थिती अशीच राहिली. तर मात्र शेतकऱ्यांना विनाकारण त्रास होण्याची चिन्हे आहेत. त्यातही यावर्षी ऑनलाईन अर्ज भरल्याशिवाय पिक विमा काढता येणार नसल्याने अडचणीत अधिक भर पडली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Farmers are getting trouble in collecting papers of pik vima