संतप्त शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, सोयाबीन बियाणे न उगवल्याने कृषी सेवा केंद्रासमोर घटना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या एका संतप्त शेतकऱ्याने रविवारी (ता.२८) बियाणे खरेदी केलेल्या नांदूरघाट येथील कृषी सेवा केंद्रासमोरच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

केज (जि. बीड)  - तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नाही. याबाबत दुकानदाराकडे तक्रार करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची दखल घेतली नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या एका संतप्त शेतकऱ्याने रविवारी (ता.२८) सकाळी बियाणे खरेदी केलेल्या नांदूरघाट येथील कृषी सेवा केंद्रासमोरच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळच असलेल्या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान साधत वेळीच शेतकऱ्यास आत्मदहन करण्यापासून परावृत्त केल्याने अनर्थ टळला आहे.

तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी खरिपाला पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. शासनाची याबाबतची प्रक्रिया होण्यास विलंब लागत आहे. पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे लालासाहेब दादाराव तांदळे (वय ५५, रा. फकराबाद, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांनी खरेदी केलेले ग्रीनगोल्ड-३३४४ व ३३५ या वाणाचे शेतात पेरणी केलेले सोयाबीन उगवले नाही.

हेही वाचा - सोयाबीन न उगवल्याने शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

ते याबाबत बियाणे खरेदी केलेल्या नांदूरघाट येथील कृषी सेवा केंद्रात तक्रार करण्यासाठी गेले होते. मात्र आपल्या तक्रारीची दुकानदाराने दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार जवळील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यास आत्मदहन करण्यापासून परावृत्त केल्याने अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक संतोष मुसळे व पंचायत समितीचे कृषी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्याची समजून घातली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's attempt at self-immolation in beed distric