(व्हिडिओ, फोटोज पहा) काळ्या आईची पुजा करुन तिच्यासोबत अमावस्येला जेवला बळीराजा (वाचा काय पद्धत)

अविनाश काळे
बुधवार, 25 डिसेंबर 2019

काळ्याआईची विधीवत पुजा करुन तिच्यासोबत शेतात बसून शेतकरी जेवण करत वेळा अमावस्या साजरी करतात. प्रामुख्याने उस्मानाबाद जिल्हात व लातूरमधील काही गावांत ही प्रथा खुप वर्षापासून असूनही सुरु आहे.या दिवशी शेतकऱ्यांचे पुर्ण कुटूंब नविन कपडे घालून आंबिल बनवून बैलगाडीतून शेतात घेऊन जातात. पुजा झाल्यानंतर सर्वजण वनभोजनाचा आनंद घेतात.या दिवशी शेतकऱ्यांचे नातेवाईकहीसहभागी झालेले असतात.  या भोजनामध्ये जेवणाचा आगळावेगळा मेनू ठरलेला असतो.

उमरगा (जि. उस्मानाबाबाद) : शेतातील उत्पन्नाची समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करत बुधवारी (ता. २५ ) काळ्याआईची मनोभावे विधीवत पुजा करून तालुक्यातील असंख्य शेतकरी कुटुंबांनी वेळा अमावस्या उत्साहाने साजरी केली. दरम्यान यंदा रब्बीच्या पेरण्या उशीरा झाल्याने पिकांचा बहार आणखी वाढला नाही. शेेतकऱ्यांनी उत्पन्नाची आशा बाळगत पारंपारिक पद्धतीने काळ्याआईची सहकुटुंब पुजाा केली. दुपारी एकनंतर शेतकऱ्यांनी नातेवाईक मित्रपरिवारासह वन भोजनाचा आनंद घेतला.

शेती व्यवसाय हा प्रमुख उदरनिर्वाहाचा पर्याय असल्याने शेतीत वर्षभर काबाडकष्ट करून मिळेल तेवढ्या उत्पन्नात समाधानी असलेल्या शेतकरी कुटुंबासाठी वेळा अमावस्याचा सण एक पर्वणीच असते. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडवली होती. परिणामी रब्बीची पेरणी उशीरा सुरू झाली. सध्या कांही शिवारात ओलीताखालील पिके बहरात आलेे असले तरी पिकांवरील किड, अळीचे विघ्न दुर करण्याचा खटापोट करावा लागतोय. वेळा अमावस्या असल्याने शहरात अघोषित संचारबंदी असतेच त्यात यंदाची अमावस्या नाताळ सणाच्या दिवशी आल्याने शासकिय, निमशासकिय कार्यालय व बँका बंद होत्या. शाळांना सुट्टी असल्याने बच्चे कंपनीला शेत- शिवारात मौजमजा करण्याला जणू संधीच मिळाली होती. अमावस्याच्या पुजेसाठी व विविध खाद्यपदार्थाच्या तयारीसाठी शेतकरी कुटुंबात मंगळवारपासुनच (ता.२३) तयारी सुरू होती.

Image may contain: 6 people, including Shabdalaya Prakashan, people smiling, outdoor and nature

वेळ अमावस्या साजरी करण्यासाठी शेतकरी कुटूंब चिमुकल्यांसह बैलगाडीतून शेतात जाताना.

हे वाचा- एमआयएम म्हणते, झारखंडमध्ये रोप लावले़; फळ मिळायला वेळ लागेल

अशी असते पद्धत

बुधवारी सकाळी सहा पासुन सर्वप्रथम ज्वारीच्या पीठ, दह्यापासुन तयार केलेल्या अंबिलाचे मडके घेऊन शेतकरी शेत शिवारात जात असल्याने चित्र दिसत होते. डोक्यावर घोंगडे पांघरून, अंबिलाच्या मडक्याला कारभारणीचं मंगळसूत्र घालुन पायी चालत शेतकरी पांडव पुजेच्या कोपीत मडक ठेवतो. आता दळणवळणाची साधने वाढल्याने बऱ्याच शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मडक्याचा प्रवास वहानातुन करीत असल्याचेही चित्र दिसून आले. बैलांना सजवुन बैलगाडीतुन सहकुटुंब शेताकडे जाण्याची मजा औरच असते. अजुनही बरेच शेतकरी कुटुंब बैलगाडीतुन वेळ अमावस्येला जाण्याची प्रथा कायम ठेवली आहे. आता दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरमधुनही शेताकडे शेतकरी कुटुंब जात असल्याचे चित्र दिसून आले. दुपारी बारानंतर शेतकरी कुटुंबांनी पाच पांडवाची विधीवत पुजा केली, त्यानंतर शेतातील ज्वारी, हरभरा पिकावर अंबिल शिंपडण्यात आले. ज्वारी, हरभरा, गहू , करडई पिकाच्या हिरवाईत बच्चे कंपनी मनसोक्त खेळाचा आनंद घेतला. वनभोजनानंतर कडवट- अंबट बोरं, हिरव्या चिंचा आणि मधमाश्यांनी संकलित केलेल्या मकरंदाचा आस्वाद चिमूूकल्यांनी घेतला.

Image may contain: 4 people, people standing, child and outdoor
शेतात पाच पांडवांची पुजा करताना शेतकरी कुटूंब. (सर्व छायाचित्रे : अविनाश काळे)

उघडून तर पहा- काय भयानक अनुभव आला या शिक्षिकेला वाचा... 

हा असतो जेवणाचा मेनू

बाजरीपासुन बनविलेले उंडे, बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या, वटाणा, हरभऱ्याचे हिरवे दाणे, बेसन यापासुन बनविलेली भाजी (भज्जी), वांगे, कांद्याची पात व हिरव्या मिरच्यापासुन तयार केलेले भरीत, गव्हाची खीर, कोंदीच्या गोड पोळ्या, आंबट भात (खिचडा) या विविध ताकदवर्धक पदार्थासह अंबिलाचा घोट घेत दुपारी साडेबारानंतर शेत शिवारात वनभोजनाचा शेतकरी कुटुंब व मित्रपरिवारांनी मनसोक्त स्वाद घेतला. उत्तरपूजेनंतर गवताच्या पेंड्या पेटवून शेत शिवारात फिरवण्यात आल्या. सांयकाळी शिवारातील लोंढा गावाकडे परतत असल्याचे चित्र दिसून आले.

Image may contain: 2 people, people standing and outdoor
शेतात आंबिल घेऊन जाताना शेतकरी

क्लिक करा- बापरे! ट्रॅव्हल्सचा अपघात एवढा भयानक? (वाचा कुठे घडलाय)

सिमावर्तीय भागातही वेळा अमावस्या साजरी
उमरगा तालुका कर्नाटक राज्याच्या सिमेलगत असल्याने बहुतांश सण- उत्सव जवळपास एकसारखे असतात. महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत असलेल्या कर्नाटकातील बहुतांश गावात वेळा अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिमावर्ती भागातील खजुरी, आणूर, होदलूर,आळंगा, लाडवंती, नंदगुर, रूद्रवाडी, जामगा, हत्तरगा, हिप्परगा आदी भागात वेळ अमावस्या साजरी करण्यात आली.
हे वाचलंत का?- मराठवाड्यातील कित्येक गावांत आज संचारबंदी का? : पहा PHOTOS


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers-celebrate velamvasya in osmanabad & Latur