पीकविम्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

उमरगा - रब्बी हंगामातील पीक नुकसानीच्या विम्याची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. मोठी रक्कम उपलब्ध होत नसल्याने जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कमी रकमेच्या खातेदारांना प्रत्येकी सात हजार रुपये वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली; मात्र त्यानंतरही रक्कम अपुरीच पडत आहे.

उमरगा तालुक्‍यासाठी २२ कोटी ८३ लाख रुपये रब्बीचा पीक विमा मंजूर झाला आहे. परंतु रक्कम उपलब्ध होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला पुरेशी रक्कम उपलब्ध होत नाही ही मोठी अडचण आहे. तर दुसरीकडे विरोधक आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी आंदोलन होत असले तरी वस्तुस्थितीकडे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. उमरगा तालुक्‍यातील पंधरा शाखांतून आतापर्यंत तीन कोटी पाच लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. दरम्यान, पन्नास हजारांपेक्षा अधिक रक्‍कम प्राप्त शेतकऱ्यांना आणखी पीकविम्याचे वाटप झाले नाही. तूर्त शेतकऱ्यांना सात हजार रुपये देण्यात येत आहेत. त्याचे वाटपही पुरेशा रकमेअभावी अर्धवट स्थितीत आहे. मध्यवर्ती बॅंकेचे राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या हैदराबाद शाखेत दोन कोटी ४९ लाख रुपये जमा आहेत; मात्र रोकड नसल्याचे कारण सांगून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले आहे. गुरुवारी (ता.२७) काही कार्यकर्त्यांनी हैदराबाद बॅंकेत जाऊन यासंदर्भात विचारणा केली. बॅंक व्यवस्थापकांनी वरिष्ठांशी संपर्क साधून दिला. तेथूनही अजून किमान दहा दिवस मोठी रक्कम उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विम्याची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या हाती पडण्यास एक महिन्याचा तरी कालावधी लागेल अशी स्थिती दिसत आहे.

Web Title: Farmers' crowds for pervasive coverage