‘या’ प्राण्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचे डोळे गेले

file photo
file photo

किनवट  (जिल्हा नांदेड): शहरापासून जवळच असलेल्या मौजे चिखली बुजुर्ग येथील आपल्या शेतातील पिकांच्या राखणीसाठी शेख जावेद शेख मुबारक (वय २५) (रा. चिखली) हा शेतात गेला असता अस्वलाने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. सदर घटनेची माहिती मिळताच किनवट वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. जखमीस तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपयांची तात्पुरत्या स्वरूपात मदत केली आहे. तालुक्यात गेल्या वर्षभरात अस्वलांचे वस्तीत, शेतात येण्याचे प्रमाण वाढले असल्याने विशेषतः जगंल परीसरात राहणाऱ्या नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

लगतच्या शेतकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की चिखली (बु.) या गावातील शेतकरी शेख जावेद शेख मुबारक हा शेतात तूर  राखण्यासाठी गेला असता शेतात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानकपणे समोरून हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्याने जखमी झालेल्या शेख जावेद याने मोठ्याने आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेल्या लगतच्या  शेतकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या अस्वलाला आरडा-ओरड करून जंगलाच्या दिशेने पळवून लावले व शेख जावेद याची त्याच्या तावडीतून सुटका करून किनवट (गोकुंदा) येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमीवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी आदिलाबादकडे पाठविण्यात आले.
 
तात्पुरत्या स्वरूपात तत्काळ पाच हजार रुपयांची मदत

वन विभागाचे उपवन संरक्षक आशीष ठाकरे व वनसंरक्षक वि.जी. गायकवाड यांनी घटनेची तात्काळ माहिती घेऊन वन परीक्षेत्राधिकारी के. एन. खंदारे यांनी पिडिताला तात्पुरत्या स्वरूपात तत्काळ पाच हजार रुपयांची मदत करण्याचे आदेशीत केले. त्यामुळे पिडिताला तात्काळ पाच हजारांची मदत देण्यात आली. जखमीसोबत वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याला आदिलाबाद येथे पाठवले आहे. घटनास्थळी वनपाल के. जी. गायकवाड, एस.एन. सांगळे, सोनकांबळे, वनरक्षक संभाजी घोरबांड, एस. पी.डोईफोडे, वाहन चालक आवळे, भूतनर आदी वन कर्मचाऱ्यांनी भेट दिली. किनवट तालुक्यात मनुष्यावर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे वन विभागाने यासंदर्भात विविध उपाय योजना तातडीने करावी व जंगलक्षेत्राजवळील राहणाऱ्या नागरिकांना संरक्षित करावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com