सडलेलं पीक बघून काळीज पिळवटून जातंय

सुषेन जाधव
Monday, 11 November 2019

  • कन्नड तालुक्यातल्या कानडगाव येथील चित्र
  • उद्धव ठाकरे आले अन्‌ गेले
  • मदतीचं काय? शेतकऱ्यांचा सवाल

औरंगाबाद : "कपाशा पलटून पल्ड्या, कैऱ्याकुयऱ्याचं नुकसान झालंय, मक्‍याला जाग्यावंच मोड येयलंय. ती घरी बी आणावं वाटंना. यंदा कैच ईलाज नै त्याला... जितकं तकदिरात व्हतं तितकंच भेटतं...,'' अशा शब्दांत शकुंतला गाडेकर परतीच्या पावसाने पिके वाया गेल्याची व्यथा सांगत होत्या. 

कन्नड तालुक्‍यातील कानडगाव हे शकुंतला यांचे गाव. त्यांना दोन मुले. दोन्ही शेती करतात. एक मुलगा शेती करून वेअरहाऊसवर काम करतो. 'सकाळ'ची टीम सकाळीच शकुंतला गाडेकर यांच्या शेतावर पोचली. नातवाला झोपी घालत भुईमुगाच्या शेंगा फोडत बसलेल्या शकुंतला यांच्या बाजूलाच रस्त्याच्या कडेला मोड आलेल्या मक्‍याच्या कणसांचा ट्रॅक्‍टर खाली केलेला होता. शकुंतला सांगत होत्या, "स्वतःच्या शेतातली मोडं आलेली मक्‍का आणताना काळीज पिळवटून जातंय. त्यामुळं पोरगं स्वतःच्या रानात जाईनाय.''

 

Aurangabad news
भिजलेल्या मक्याकडे हताशपणे पाहताना शकुंतला गाडेकर

महिला शेतकरी म्हणून कोणीच का विचारत नाही? 

परतीच्या पावसाने कन्नड, सिल्लोड, सोयगाव तालुक्‍यातील पुरते नुकसान झाले आहे. कृषी व महसूलचे अधिकारी एकदा येऊन गेले की, परत काहीच कळायला मार्ग उरत नाही. राजकीय नेतेही रस्त्यावरचीच पिकं पाहून जातात. शेतकऱ्यांना घोळक्‍याने भेटतात. महिला शेतकरी म्हणून कोणते अधिकारी, कोणते राजकारणी किती बोलतात? हा प्रश्‍न विचार करायला भाग पाडणारा आहे. आम्ही शेतात राबत नाही का? पण, आमच्याशी कोणाला बोलावे वाटेल असे प्रश्‍न जागोजागी नुकसानीची पाहणी करण्यास गेल्यावर समोर आले.

रानात पैशांचा हिशेब लावता येत नाय, आपण नुसतं भिशी भरल्यावानी पैसं खर्चत (गुंतवत) ऱ्हायचं. एकदाच मिळतेत. या आशेनं खर्च करतोत; पण हिशेब लावायला गेलं की, एकशा थंड्या वाजून येत्या. मदत मिळायला पायजे; पण मदतीसाठी कुणाकडं बघणार हेच कळनाय? 
- शकुंतला गाडेकर, शेतकरी, कानडगाव (ता. कन्नड) 

Aurangabad News
परतीच्या पावसाने सडलेली मका

गणित ऐकायचंय का आमचं? 

आम्हा शेतकऱ्यायचं गणित ऐकायचंय का तुम्हाला म्हणत शकुंतला यांनी हातातली कामं सोडून सांगायला सुरवात केली. त्या सांगत होत्या, मध्ये-मध्ये खर्चाचं गणित करून त्यांचे पती अशोक गाडेकरही गणित करत होते. 22 दिवस मक्‍का रानात सडून गेली. स्वतःच्या रानातलं सोडा; पण तीन एकरांत ठोक्‍यानं मक्‍का लावल्ती. आठ पिशव्या पेरल्या (2200 रुपये प्रति चार किलोच्या) बियाणं 17 हजारावर गेलं. डीएपी एकरी तीन गोण्या 12 हजार 600, मजुरी, नांगरणी, रोटाव्हेटर सगळा खर्च तीस-पस्तीस हजारांवर गेला. एकरी 32 क्विंटलपस्तोवर मक्का व्हायची. आता आठ क्विंटलबी निघाया मारामार व्हईल, असे त्यांनी सांगितले. 

Uddhav Thackeray in Kanadgaon

नेते आले; पण आता काय? 

राजकारणी नेते येतेत, पाहणी करतेत, फुटू काढतेत; पण अजून आठ-दहा दिवस होत आलं तरी त्याचं काय झालं हे मातर कळायला मार्ग नाही. नेमके नेते काय घोषणा करतील आता, या भाबड्या आशेने शकुंतला यांनी विचारणा केली. त्या सांगत होत्या, "कोणी नेते आले की, कृषी, महसूलचे अधिकारी येतेत, चौकशी करतेत, असं सांगा तसं सांगा; पण नंतर कोणी वाली का उरत नाही?'' 

 

Aurangabad Kannad News
रुस्तुमनाना भोसले

बाजरी गेली. त्यामुळे खायचा प्रश्‍न निर्माण झाला. दिवाळीला पैसा देणारं मका, कपाशी पीक गेलं. परतीच्या पावसामुळे आम्ही हवालदिल झालो आहोत. डोळ्यांत फक्त अश्रू शिल्लक आहेत. शेती सोडून पळ काढता येत नाही. आत्महत्या करू शकत नाही. 
- रुस्तुमनाना भोसले, कानडगाव (ता. कन्नड)

हेही वाचा -

दीडशेच्या चड्डीसाठी दिले दोन हजार, तरुणास अटक

औरंगाबादेत या बँकेत मिळते बिनव्याजी कर्ज

राम मंदिर, मशीद आणि छत्रपतींचा पुतळा शेजारी शेजारी

पावसामुळे कंपनीवर पडतोय पैशांचा पाऊस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers needs Help, not just sympathy