
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत समावेश होऊनही निधीची रक्कम बॅंक खात्यावर जमा होत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी येथील तहसील कार्यालयात चौकशी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी या योजनेत तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश करताना महसूल विभागाने युद्धपातळीवर शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत केली.
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत समावेश होऊनही निधीची रक्कम बॅंक खात्यावर जमा होत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी येथील तहसील कार्यालयात चौकशी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी या योजनेत तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश करताना महसूल विभागाने युद्धपातळीवर शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत केली.
तालुक्यात या योजनेच्या माध्यमातून 43 हजार 850 पात्र शेतकऱ्यांच्या नावांची नोंद महसूल दप्तरी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील 40 हजार 28 शेतकऱ्यांची नावे या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर उर्वरित 3 हजार 822 शेतकऱ्यांच्या नावांचा समावेश होणे बाकी आहे. त्यातही बऱ्याच शेतकऱ्यांना योजनेतील निधीची रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही. सन्मान योजनेचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या योजनेतील बहुतांश शेतकऱ्यांना योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधी कुणाला मिळाला, तर कुणाला नाही. कित्येक जणांना दुसरा व तिसरा देखील हप्ता प्राप्त झाला. परंतु या योजनेच्या माध्यमातून बॅंक खात्यावर हप्ताच जमा न झालेले शेतकरी तहसील कार्यालयाच्या खेट्या घालत आहेत.
माहिती ऑनलाइन केल्याच्या पावत्या मिरविताना निधी का मिळत नाही, असा प्रश्न शेतकरी करीत असताना आता यामध्ये महसूल विभागाने मोठ्या चुका माहिती भरताना केल्या असल्याचा प्रकार समोर येत आहे. यामध्ये बॅंक खाते क्रमांक, शेतकऱ्यांची नावे, आधार क्रमांक आदी चुकीचे टाकल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे या योजनेत नावे समाविष्ट झालेल्या शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणेच महसूल दप्तरी चकरा माराव्या लागत आहेत.