esakal | मुख्यमंत्री अन्न योजनेचा शेतकऱ्यांनाच लाभ मिळेना!
sakal

बोलून बातमी शोधा

Ration

मुख्यमंत्री अन्न योजनेचा शेतकऱ्यांनाच लाभ मिळेना!

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर: लॉकडाऊनच्या (covid 19 lockdown) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील (mukhyamantri garib kalyan yojana) मोफत धान्याचा लाभ शेतकरी कुटुंबांना मिळणार नाही. या कुटुंबांना नेहमीप्रमाणे रोखीने धान्य खरेदी करावे लागणार आहे. उर्वरित प्राधान्य कुटुंबांसह अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना मात्र, मोफत धान्याचा डबल धमाका झाला असून, केंद्र सरकारकडून दोन तर राज्य सरकारकडून एका महिन्याचे धान्य मोफत मिळणार आहे. दरमहा मिळणाऱ्या नियमित धान्याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या योजनेतील मोफत धान्य मिळणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून प्राधान्य कुटुंबांना व अंत्योदय योजनेतील लाभार्थींना दरमहा दोन रुपये किलो दराने तीन किलो गहू व तीन रुपये किलो दराने दोन किलो तांदूळ देण्यात येतो. यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्यात येतो, तर अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटुंबाला ३५ किलो धान्य मिळते. अन्न सुरक्षा योजनेची सुरवात झाल्यानंतर अनेक राज्यातील गरजू शेतकऱ्यांना स्वस्त धान्याचा लाभ मिळत नसल्याचे सरकारच्या लक्षात आले. यामुळे राज्य सरकारने योजनेबाहेरील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर योजना सुरू केली. तेव्हापासून अनेक शेतकरी कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेप्रमाणेच स्वस्त धान्याचा लाभ मिळत आहे.

हेही वाचा: मराठवाड्यातील रुग्णसंख्या घटतेय पण बीडमधील परिस्थिती चिंताजनक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकारने ‘ब्रेक द चेन’ लॉकडाऊनची घोषणा केली. यात काही घटकांना पॅकेज स्वरूपात मदत जाहीर करण्यात आली. यातूनच प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून दरमहा नियमित देण्यात येणारे एका महिन्याचे धान्य मोफत देण्याचा निर्णय झाला. मात्र, शेतकरी कुटुंबातील सदस्यांना हे मोफत धान्य देण्याचा निर्णय झालाच नाही. यामुळे अन्य योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळत असताना शेतकरी कुटुंबांना नेहमीप्रमाणे रोखीने धान्य खरेदी करावे लागत आहे.
मुख्यमंत्री योजनेतील मोफत धान्याचा लाभ मागील एप्रिल महिन्यापासून देण्यात येत आहे. एप्रिलमध्ये लाभ न घेतलेल्या शिधापत्रिकाधारकांना चालू महिन्यात लाभ देण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुने यांनी सांगितले.

दोन महिने दुप्पट धान्य
मुख्यमंत्री योजनेतील मोफत धान्यासोबत केंद्र सरकारनेही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून मे व जून महिन्यासाठी दरमहा मिळणाऱ्या स्वस्त धान्याव्यतिरिक्त मोफत धान्य उपलब्ध केले आहे. यात प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांच्या प्रत्येक सदस्याला मे व जूनमध्ये तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. यामुळे चालू महिन्यात प्रत्येक सदस्याला राज्य व केंद्र सरकारचे मिळून सहा किलो गहू व चार किलो तांदुळ मोफत मिळणार आहेत. तर जून महिन्यात केंद्र सरकारकडून प्रत्येक सदस्याला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत तर राज्य सरकारकडून नेहमीप्रमाणे रोखीने तीन किलो गहू व दोन किलो तांदळाचे वाटप करण्यात येणार असल्याचे पडदुने यांनी सांगितले. यामुळे दोन महिन्यात शिधापत्रिकाधारकांना मोफत व स्वस्त धान्याचा चांगलाच लाभ होणार आहे.

हेही वाचा: बाजारपेठा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

लातूर जिल्ह्यातील लाभार्थी

- अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक - ४१,३२७
- अंत्योदय कुटुंबातील सदस्य संख्या - २,१५,८८८
- प्राधान्य कुटुंबांतील शिधापत्रिकाधारक - ३,०२,७४२
- प्राधान्य कुटुंबांतील सदस्य संख्या - १५,०४,८४५
- शेतकरी कुटुंबातील सदस्य संख्या - ३,०६,८९९