बस्स, कृत्रिम पाऊस पाडू नका!

प्रकाश बनकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यात कायम दुष्काळी परिस्थिती असल्याने यंदा शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अमेरिकेतील एका कंपनीला 52 दिवसांसाठी कंत्राटही दिले; त्यानुसार पावसाचे ढग दिसतील तिकडे क्‍लाऊड सीडिंग केले जात आहे. शनिवारी (ता. 28) सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद तालुक्‍यांत या विमानाने सीडिंग केले. सिल्लोडमधील अंभई गावात अनेक दिवसांपासून सुरू असलेला नैसर्गिक पाऊस तीन दिवसांपूर्वी थांबला. त्यात पुन्हा कृत्रिम पाऊस पाडणारे विमान आल्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून, आमच्याकडे कृत्रिम पाऊस पाडू नका, असे ते सांगत आहेत. 

जवळपास 30 कोटी रुपये खर्च करून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जात आहे. त्यासाठी शनिवारी (ता. 28) दुपारी तीन वाजून 28 मिनिटांनी हे विमान टेक ऑफ झाले. त्याने सोंबळगाव, खुलताबाद, औरंगाबाद येथे उड्डाण घेतले. मालेगाव, फुलंब्री तेथून पुढे सिल्लोड तालुक्‍यातील सराटी, सिल्लोड, वडाळा, अजिंठा, भराडी, अंभई या गावांच्या परिसरात या विमानाने सीडिंगचा मारा केला. अंभई परिसरात हे विमान सायंकाळी पाचनंतर आले होते. यामुळे बोजगाव, पांगरी शिवारात काही मिनिटे हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. सिल्लोड तालुक्‍यात रविवारी सकाळी साडेआठपर्यंत 1.50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

गरज होती तेव्हा नाही... 

जुलै आणि ऑगस्टमध्ये मराठवाड्यातील बहुतांश भागांत कृत्रिम पावसाची गरज होती; पण पुरेशे ढग नसल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला नसल्याचे प्रशासन त्यावेळी सांगत होते; पण आता परतीचा पाऊस मुसळधार पडलेला असतानाही केवळ आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडला जात आहे. यामुळे पिकाला फायदा होण्याऐवजी नुकसानच होत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. 

30 कोटी रुपये पाण्यात? 

ज्या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, अशा परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याअनुषंगाने नऊ ऑगस्टपासून मराठवाड्यासह सीमेलगतच्या वाशीम, बुलडाणा आणि अहमदनगर जिल्ह्यांतही कृत्रिम पावसाचे प्रयोग केले; मात्र हे प्रयोग किती प्रमाणात यशस्वी झाले? विमान सतत आकाशात घिरट्या घालत आहे; पण जेव्हा गरज होती तेव्हा नेमका किती पाऊस पडला, याबद्दलची माहिती खुद्द महसूलच्या अधिकाऱ्यांकडेही उपलब्ध नाही. परिणामी, शासनाचे तब्बल 30 कोटी रुपये पाण्यात तर गेले नाहीत ना, अशी शंका उपस्थित होत आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers opposing for artificial rain