शेतकरी संघटना सोडण्याचा विचार नाही - खोत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

राजू शेट्टींचे माझ्यावर लेकरासारखे प्रेम

राजू शेट्टींचे माझ्यावर लेकरासारखे प्रेम
औरंगाबाद - 'स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी माझ्यावर नाराज आहेत, अशी चर्चा आहे. पण, खरा नेता कधीही नाराज होत नसतो. कार्यकर्ता म्हणून त्यांचे माझ्यावर लेकरासारखे प्रेम आहे. आम्ही दोघे स्वाभिमानी संघटनेची दोन चाके आहोत. त्यामुळे संघटना सोडण्याचा माझा कुठलाही विचार नाही'', अशी स्पष्टोक्ती कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी केली.

शहरात आज शेतकरी मेळावा झाला. यात बोलताना ते म्हणाले, ""भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही चळवळी टिकाव्यात असे धोरण आहे. कार्यकर्ता म्हणून शेट्टी माझ्यावर लेकराप्रमाणे प्रेम करतात. मुळात खोत आणि वादळे यांचे सख्ख्या भावाचे नाते आहे. आजवर ज्या ज्या लढाया लढलो त्याचे वादळ झाले. ऊस, दूध, राष्ट्रवादी संघर्ष, माढा लोकसभा निवडणूक, मुलाचा निवडणुकीत झालेला पराभव या वादळांशिवाय सदाभाऊ पूर्णच होऊ शकत नाही.'' आपण भाजपच्या व्यासपीठावर गेलो म्हणून टीका होते. हा शोधच मुळात नवीन आहे, हे सांगताना संघटना सोडण्याचा विचार नाही, असेही खोत म्हणाले.

बछडा दिलदारपणाने लढला
मुलाच्या पराभवाविषयी बोलताना, 'बछडा 122 मतांनी हरला म्हणून काय झाले? तो दिलदारपणे लढला!'' असे उद्‌गार त्यांनी काढले. ""राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात केवळ 122 मतांनी पराभव होणे हे विजय मिळविल्यासारखेच आहे. त्यामुळेच त्याची गावकऱ्यांनी विजयी उमेदवारासारखी मिरवणूक काढली'', असेही खोत म्हणाले.

Web Title: farmers organization did not think to leave