केंद्रीय पथकाकडे शेतकऱ्यांनी मांडल्या दुष्काळाच्या व्यथा

आनंद इंदानी
बुधवार, 5 डिसेंबर 2018

बदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला भेट दिली. अवघ्या विस मिनिटाच्या दौऱ्यात पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाण्याअभावी जळालेल्या तूर, कापूस व बाजरीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना नुकसानीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.

बदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला भेट दिली. अवघ्या विस मिनिटाच्या दौऱ्यात पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाण्याअभावी जळालेल्या तूर, कापूस व बाजरीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना नुकसानीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.

या पथकात केंद्रीय नीती आयोगाचे सल्लागार मानष चौधरी, केंद्रातील पाणीपुरवठा व स्वछता मंत्रालयातील सचिव एच. सी. शर्मा व कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग यांचा समावेश होता. जवसगाव येथील महिला शेतकरी सुवर्णा सुखदेव अंभोरे यांच्या शेताला पथकाने भेट दिली. यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधताना कुठले पीक आहे? कधी लागवड केली होती? पिकाची अवस्था कशी आहे? पाऊस किती झाला? पिकांना पाणी देण्यासाठी पावसा व्यतिरिक्त इतर स्रोत आहे का? मागच्या वर्षी किती उत्पन्न झाले होते? पीक लागवडीला काय खर्च लागला? किती उत्पन्न झाले अथवा अपेक्षित आहे? किसान क्रेडिट कार्ड आहे का? पीकविमा काढलाय का? मागच्यावेळी पिकविम्याचा मोबदला मिळाला का? पीककर्ज घेतले काय? थकीत कर्ज आहे का? असे प्रश्न हिंदीतून विचारले. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, आमदार नारायण कुचे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे पथकाला समजून सांगितले. यावेळी महिला शेतकरी सुवर्णा अंभोरे यांनी दुष्काळी व्यथा मांडताना आमची संपूर्ण शेती निसर्गावर आधारित आहे. यंदा आम्ही तूर, कापूस, बाजरी अशा पिकांची लागवड केली होती. मात्र संपूर्ण हंगामात दोन - तीनदाच पाऊस झाला. त्यामुळे पावसाअभावी खरीप पिके पुरती जळून गेली आहेत.

मागच्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्के देखील उत्पन्न मिळाले नाही. आम्ही शेतीसाठी पीककर्ज घेतले होते मात्र उत्पन्नच नसल्यामुळे कर्ज फेडण्याची विवंचना सतावत आहे. सध्या आमच्यावर थकीत व नियमित असे तीन लाख रुपयांचे कर्ज आहे. खरीप पिकविमाही भरला असून अद्याप कोणत्याही शेतकऱ्याला पिकविण्याची मदत व दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. जमिनीत ओल नसल्यामुळे रब्बीचे पीकही घेता येणार नाही. एकूणच जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी अपेक्षाही केंद्रीय पथकाकडे व्यक्त केली. पथकाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांची नोंद घेतली असून या संदर्भातील अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार आहेत. 
यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, आमदार नारायण कुचे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, बदनापूरच्या तहसिलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी रामदास पाटील यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील महसूल, कृषी, पशुधन, सिंचन विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी बिनवडे व आमदार कुचे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे पथकाकडे पोचवले. जवसगाव येथे केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांशी हिंदीतून संवाद साधला. त्यामुळे गोंधळलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न हिंदी व इंग्रजीतून मांडण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व आमदार नारायण कुचे यांनी केला. जिल्हाधिकारी बिनवडे यांनी प्रधानमंत्री फसलविमा योजनेत जालना जिल्ह्याला पुरस्कार मिळाल्याचे सांगत, पावसाच्या सततच्या लहरीपणामुळे शेतकरी जागरूक झाले असून त्यामुळे पीकविमा योजनेला प्रतिसाद मिळत आहे, असे स्पष्ट केले. 

केवळ वीस मिनिटात उरकला दौरा
जवसगाव येथे दुष्काळी पाहणीसाठी आलेले पथक दुपारी 12 वाजून 32 मिनिटाला पोचले. अवघ्या वीस मिनिटात पिकांची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद साधून पथक रवाना झाले. या पथकातील अधिकाऱ्यांना आंतरपिकातील मटकीची पाहणी केली. मात्र मटकी म्हणजे नेमके काय हे उमजत नव्हते. शेवटी तालुका कृषी अधिकारी रामदास पाटील यांनी इंग्रजीतून मटकीचा अर्थ पथकातील अधिकाऱ्यांना सांगितला.

Web Title: farmers shares there problem with officers