डाळिंबासह बांधावरच नारळीबाग 

Dadasaheb Shinde
Dadasaheb Shinde

औरंगाबाद - यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने शेतात काही उगवले नाही. चारही बाजूंनी उजाड झालेली शेती. भोवती उंच डोंगर, माळरान. शिवगड तांड्यापुढं सिंदोन
गाव... रखरखत्या उन्हातून रस्त्याच्या डाव्या बाजूला दादासाहेब दौलतराव शिंदे यांची डाळिंबानं लगडलेली बाग. तहानेनं व्याकूळ होऊन गेल्यानंतर समोर पाण्याच्या ग्लासाऐवजी थंडगार गोड पाणी असलेले शहाळे प्यायला मिळते. वाटतं, आपण कोकणात आलो की काय! दुष्काळाने होरपळत असलेल्या जिल्ह्यात त्यांनी चक्‍क बांधावर ठिबकनं नारळाची झाडं जोपासली आहेत.

 कचनेरच्या रस्त्यावर सिंदोन भिंदोन या दोन्ही गावांत मिळून डाळिंब, सीताफळाच्या सुमारे 30 एकरांत बागा आहेत. साखर कारखान्यातील मोठ्या पदावरची नोकरी सोडून दादासाहेब शिंदे शेतीकडे वळले. त्यांच्याकडे 16 एकर शेती आहे. नऊ एकरांत फळबाग केली असून, भगवा वाण लावले आहे. फळबाग जगवण्यासाठी दीड एकराचे शेततळे केले. दोन कोटी लिटर आणि 2 कोटी 40 लाख लिटरचे अशी दोन शेततळी केली आहेत. शेततळ्यांतील पाणी विहिरीत आणून ते फिल्टर करून बागेला दिले जाते. सुरवातीला पाच एकरांत डाळिंब लावले.

बागेच्या बांधावर नारळाची 400 झाडे वाढली आहेत. श्री. शिंदे म्हणाले, ""पालघर येथील सेंट्रल कोकोनट बोर्डाच्या नर्सरीतून ही रोपे आणली. वाहतुकीसह 75 रुपयांना एक रोप पडलं. तिसऱ्या वर्षापासून फळे येणं सुरू झालं. आणखी दोन वर्षांनी एक झाड किमान 100 ते 125 फळे देईल. जागेवर 10 रुपयाला एक नारळ जरी गृहीत धरले तरी एक झाड हजार ते बाराशे रुपयांचे उत्पन्न देईल. आपल्या भागात ही झाडं येतात. पूर्णपणे ठिबकवर असून, डाळिंबासोबतच पाणी देत असतो. यंदा पुन्हा 4 एकर डाळिंब लागवड केली असून, त्याच्या बांधावरही दोन - अडीचशे नारळाची रोपे लावणार आहे. माझ्याकडून माहिती घेऊन जिल्ह्यात अन्य शेतकऱ्यांनीदेखील या नारळाची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी बांधावर गवत वाढू देण्याऐवजी नारळाची झाडे लावणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो,'' असे मत त्यांनी व्यक्‍त केले. 
  
सातशे ग्रॅमपर्यंत डाळिंब 
सध्या बागेत सर्वाधिक म्हणजे 700 ग्रॅम वजनाचे डाळिंब भरले आहेत. साडेतीन एकरांत सीताफळ लावण्याचे नियोजन केले आहे. डाळिंब हस्त बहरात आहे. सध्या जागेवरच 60 रुपये किलोने भाव मिळत असून, 10 एप्रिलनंतर दरात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. कारण पूर्णपणे सेंद्रिय बाग असून, डाळिंबाचा आकार व गोडवा यामुळे चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा श्री. शिंदे यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com