
कांद्याचा भाव घसरल्याने शेतकरी त्रस्त
घनसावंगी - बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भावात मात्र कमालीची घसरण झाली आहे. आधी ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा कांदा यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणत असल्याचे चित्र आहे. किलोमागे दहा ते पंधरा रुपयांचा फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. मागील काही वर्षी कांदा शंभर रुपये किलोच्या आसपास पोहचला होता यामुळे ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आले असले तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांद्याच्या पिकाबाबत शेतकऱ्यांना काहीसा लाभ मिळाला होता. संपूर्ण महाराष्ट्रात कांदा १० हजार ते वीस हजार क्विंटल आसपास भाव होता.
ग्रामीण भागातील बाजारात दिसणारा कांदा १०० च्या आसपास भाव मिळाला होता अनेक बाजारपेठेत कांद्याला दोनशे रुपये किलोप्रमाणे भाव मिळाल्याचे उदाहरण घडले होते परंतु मागील दोन वर्षापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव त्यानंतर अतिवृष्टीचा मारा यामुळे कांद्याचे उत्पादन घटले. साधारणपणे गेल्या आठवड्यांत कांदा १ हजार ते १ हजार ५०० रुपये क्विंटल दराने भावात घसरण झाली आहे. दुसरीकडे मागील वर्षीचा अनुभव पाहता यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले आहे. त्यांची सर्वत्र काढणी सुरू आहे. तसेच कांदा साठवण क्षमतेला मर्यादा असल्याने उरलेला कांदा बाजारात आणण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. याचा भावाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
साधारण आठ ते दहा रुपये किलो दराने कांदा मिळत असल्याने अनेक जण जास्त कांदा घरी घेऊन जात आहेत. शेतकऱ्यांना यंदा उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत कांद्याची विक्री करावी लागत असल्याची स्थिती आहे. कांद्याचे भाव मार्च अखेरीस घसरतात असाच आजवरचा अनुभव यंदाही पाहायला मिळाला. उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. व्यापारी अत्यंत कमी भावाने कांदा घेत असल्याने बरेच शेतकरी शहरातील रस्त्यावर स्वतःचा कांदा विक्रीसाठी बसलेले पाहायला मिळत आहेत. महिनाभरापूर्वी ३० ते ४० रुपये किलो दराने कांदा विकला जात होता. त्यापूर्वी थेट ६० ते ८० रुपये किलोपर्यंत भाव होता. शिवाय लहान आकाराचा कांद्यालाही भाव मिळत होता. परंतु यंदा बाजारात कांद्याला ५०० ते ७०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. किरकोळ आठ ते दहा रुपये दराने कांदा विकला जात आहे. मध्यंतरी बेमोसमी पावसाने यंदा कांद्याची आवक उशिरा झाली. अशातच उन्हाळी कांदा शेतकऱ्यांनी विक्रीला आणला आहे. त्यामुळे भावात आणखी घसरण झाली आहे.
मागील काही वर्षीचा अनुभव पाहता यंदा कांदा पिकातून चांगली कमाई होईल अशी आशा आहे. मात्र बाजारात कांद्याची आवक वाढत असल्याने दरामध्ये मागील वर्षीपेक्षा मोठी घसरण होत आहे. यंदा कांद्यातून चांगल्या उत्पादनाबरोबर चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती.
- रामचंद्र गिऱ्हे, शेतकरी, मंगूजळगाव
Web Title: Farmers Suffer As Onion Prices Fall By Rs 10 To Rs 15 Per Kg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..