परभणीत पिक विम्यासाठी शेतकरी झाडावर

परभणीत पिक विम्यासाठी शेतकरी झाडावर

परभणी : सततची नापिकी आणि मागील तीन वर्षापासून पिक विम्याच्या लाभापासून वंचित राहिल्याने हातश झालेल्या तरुण शेतकऱ्यांने  सोमवारी (ता.१८) परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालय परिसरातील लिंबाच्या झाडावर जाऊन गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

नरहरी तुकाराम यादव (रा.बोरवंड ता.परभणी) असे या आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचे नाव आहे. यादव यांना केवळ एक हेक्टर जमिन असून ते दुसऱ्याची शेती बटईने करतात. मागील चार वर्षापासून दुष्काळामुळे ते आर्थीक संकटात सापडले आहेत. यात दरवर्षी पिक विमा भरुनही त्यांना अद्याप एकदाही विमा मिळाला नसल्याची त्यांची तक्रार आहे. गतवर्षी पिक डोळ्या देखत करपुन गेले तरीही विमा मिळाला नाही. त्यात कुटूंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण यामुळे ते हताश झाले होते. मुलगा आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असल्याने त्याला सोमवारी पैसे पाठवायचे होतो. त्यामुळे बटईच्या शेतात वेचलेला कापुस विक्री काढला होता. त्यासाठी बाजार समितीमध्ये कापसाचे बिट सुरु झाले का? याची माहीती घेण्यासाठी आले असता अद्याप बिट सुरु झाले नसून काही दिवस लागणार असल्याची माहीती मिळाली. त्यामुळे ते आणखीच निराश झाले. अचानक सोबत असलेली दोरी घेत पिक विमा द्या, अशी मागणी करत बाजार समितीच्या मुख्य कार्यालय परिसरात असलेल्या लिंबाच्या झाडावर जात गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

कर्मचाऱ्यांनी उतरवले खाली
 ही बाब परिसरात असलेल्या कामगार, कर्मचारी यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड करत यादव यांना खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते खाली उतरत नसल्याचे पाहुन जवळ असलेल्या कोतवाली पोलिस ठाण्यास माहीती दिली. फौजदार बालाजी चव्हाण हे सहकाऱ्यासह दाखल झाले. चव्हाण यांनी यादव यांची समजुत काढत त्यांना खाली उतरविले. या वेळी त्यांनी पिक विमा मिळाला नसल्याने आपण सरकार आणि विमा कंपनीच्या कारभाराला कंटाळुन आत्महत्या करत होतो, असे सांगितले. घटनास्थळी बाजार समितीचे संचालक गणेश घाटगे, सचिव विलास मस्के यांनी धाव घेत त्याचे समुपदेशन केले. पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी यादव यांना ताब्यात घेतले आहे.


विमा कंपनीने भूमिका जाहीर करावी
परभणी जिल्ह्यात २०१८ मध्ये पिक विम्यासाठी मोठे आंदोलन उभे राहिले होते. तब्बल दोन महिने हे आंदोलन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर मुंबईत रिलायन्स विमा कंपनीच्या कार्यालयासमोर मोर्चाही काढला मात्र, रिलायन्स विमा कंपनी ने २०१७ च्या हंगामातील पिक विमा मंजूर केला नाही. अनेक मंडळी पिक विम्याच्या लाभापासून वंचित राहील सर्वपक्षीय आंदोलनामध्ये सहभागी होऊन देखील विमा कंपनीने न जुमानता अनेक मंडळातील शेतकऱ्यांना विमा दिला नाही. यंदा ओला दुष्काळ पडूनही अद्याप विमा कंपनीने आपली भूमिका जाहीर केली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत, त्यातूनच अशा घटना घडत आहेत.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com