डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना शेळीपालनाने तारले

मधुकर कांबळे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

डोंगराळ भाग, पावसाचे अत्यल्प प्रमाण यामुळे शेतीतून फारसे काही पिकत नाही. अशा संकटात आडगाव सरक येथील शेतकरी सापडले होते. मात्र, या हतबल झालेल्या शेतकऱ्यांना गरिबांची गाय समजल्या जाणाऱ्या शेळीपालनाने तारले

औरंगाबाद : डोंगराळ भाग, पावसाचे अत्यल्प प्रमाण यामुळे शेतीतून फारसे काही पिकत नाही. अशा संकटात आडगाव सरक येथील शेतकरी सापडले होते. मात्र, या हतबल झालेल्या शेतकऱ्यांना गरिबांची गाय समजल्या जाणाऱ्या शेळीपालनाने तारले. व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशनमध्ये या गावाची निवड झाली आणि जनजागृती प्रतिष्ठानच्या पुढाकाराने या गावातील शेतकऱ्यांनी शेळीपालनाची शेतीला जोड दिली. यामुळे आज या गावात सुमारे 50 शेतकऱ्यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन सुरू केले आहे. 

व्हिलेज सोशल ट्रान्सफार्मेशनअंतर्गत जनजागृती प्रतिष्ठानअंतर्गत दहा ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये शेतीव्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आडगाव सरक हा पूर्णपणे डोंगराळ भाग आहे. पावसाने प्रमाण कमी असल्याने शेतीतून पोटापुरते मिळते यामुळे दुग्धव्यवसायाची शेतीला जोड देण्यात आली आहे. वर्षभरात शेतीच्या जोडव्यवसायात शेळीपालनाची भर पडली आहे.

शेळीपालनाकडे शेतकरी वळावेत यासाठी जनजागृती, कृषी विज्ञान केंद्र आणि पशुसंवर्धन विभागातर्फे व्हीएसटीएफमध्ये निवडण्यात आलेल्या दहा ग्रामपंचायतींमधील सुमारे दीडशे शेतकऱ्यांना तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

सकाळकडून मागदर्शन 

रामदास पठाडे : जनजागृती प्रतिष्ठानचा ग्रामप्रेरक म्हणून या गावात काम करत आहे. यापूर्वी मी स्वतः: शेळीपालन केले आहे. शेळीपालनामुळेच मी माझ्या मुला मुलींचे शिक्षण पूर्ण केले. मुलीचे लग्न केले. शेळीपालनाविषयी मी "सकाळ' कार्यालयात आयोजित प्रशिक्षणातूनही मार्गदर्शन घेतले. त्याचा खूप फायदा झाला, शेळ्यांची निवड, त्यांच्यातील मर कशी रोखावी, मांसासाठी कोणत्या शेळ्या निवडाव्यात, त्यांची निगा कशी राखावी अशी खूप माहिती मिळाली. शेळीपालनाच्या माझ्या या अनुभवाचा इतरांनाही उपयोग व्हावा यासाठी इतर शेतकऱ्यांना प्रवृत्त केले आणि हळूहळू इतर शेतकरीही शेळीपालनाकडे वळले आहेत. 

 
भीषण दुष्काळातही तारले 

 
निवृत्ती पठाडे : सुरवातीला माझ्याकडे एक शेळी होती. तिच्यापासून होणाऱ्या पिल्लांपैकी पाठी (मादी) ठेवायच्या आणि बोकड विकायचे. बोकडाच्या विक्रीतून दुसरी पिल्ले घ्यायची असे करत आज माझ्याकडे 150 शेळ्यांचा फार्म तयार झाला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने स्टेट बॅंक ऑफ इंडियामार्फत गावातील आठ ते दहा जणांना प्रत्येकी दहा लाखाचे कर्ज दिले. मला मिळालेल्या कर्जातून साडेतीन लाखाचे शेड बांधले आहे. औरंगाबाद येथे "सकाळ' कार्यालयात शेळीपालनाविषयी घेतलेल्या प्रशिक्षणाचा खूप चांगला फायदा झाला. शेळीपालनाने आर्थिक उत्पन्न तर वाढलाच याबरोबर पाच एकर शेतीत लेंडीखत वापरत असल्याने पिकेही चांगली येतात आणि रासायनिक खतावरचा खर्चही कमी झाला आहे. आमचे गाव डोंगराळ असल्याने शेळीपालन शेतीला खूप चांगला जोडव्यवसाय आहे. अर्धबंदिस्त शेळीपालन केल्यास इथे चाऱ्याचा खर्चही कमी होतो. गेल्यावर्षी भीषण दुष्काळातही शेळीने मला तारले. 

 
शेतीला आधार 

 
वंदना घाईट : तीन एकर शेती आहे, विहीर आहे पण पाणी फक्‍त पावसाळ्यातच राहते आणि तेही भरपूर नसते. जनजागृती प्रतिष्ठानचे डॉ. भगवानराव कापसे यांच्या प्रोत्साहनामुळे आम्हीही शेळीपालन सुरू केले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 5 लाख रुपयांचे कर्ज मिळाले आहे. आता आमच्याकडे 12 शेळ्या आहेत. यामुळे आता आमच्या शेतीला आधार मिळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers were saved by goat farming