एक जूनपासून शेतकऱ्यांना मिळणार ऑनलाईन खत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

माजलगाव - शेतीसाठी लागणाऱ्या खताची विक्री ऑनलाईन होणार आहे. पंचायत समिती सभागृहात बुधवारी (ता.२६) कृषी दुकानदारांना पीओएस मशीनचे वाटप करण्यात आले असून, एक जूनपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे आधारकार्ड व त्याचा अंगठा जुळल्याशिवाय खतविक्री करता येणार नाही. ऑनलाईन खतविक्री झाली तरच कंपनीला सबसिडी मिळणार असल्याने खताच्या काळ्या बाजाराला आळा बसणार आहे.

आतापर्यंत खताचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत होता. कधी खत कंपन्या जास्तीचे उत्पादन दाखवून शासनाची सबसिडी लाटण्याचा प्रकार होत असे तर, कधी दुकानदार खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची लूट करीत होते. याला आळा घालण्यासाठी शासनाने आता खताची थेट ऑनलाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी एक जूनपासून करण्यात येणार आहे. यासाठी पंचायत समिती सभागृहात बुधवारी (ता.२६) तालुक्‍यातील १०६ कृषी दुकानदारांना पीओएस मशीनचे वाटप करण्यात आले आहे. या मशीनमध्ये जीपीएस प्रणाली असून ती ऑनलाईन करण्यात येणार आहे. दुकानदाराने आणलेल्या खताचा पूर्ण साठा यात फीड करणे बंधनकारक राहणार आहे. 

ऑनलाईन विक्रीमुळे खताच्या काळ्या बाजाराला मोठ्या प्रमाणत आळा बसणार असल्याने यापुढे शेतकऱ्यांना मुबलक, योग्य किमतीत खते मिळण्याची आशा आहे.

शासनाने खताची ऑनलाईन विक्री सक्तीची केली असल्याने दुकानदारांना पीओएस मशीनचे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे आधारकार्ड, अंगठा जुळल्याशिवाय खताची विक्री करता येणार नाही.
-सिद्धेश्वर हजारे, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती

पारदर्शकता येणार
ऑनलाईन पद्धतीने खत विक्री झाली तरच कंपनीला सबसिडी मिळणार असल्याने खताचा दुरुपयोग करता येणार नाही. दरवर्षी शेतकरी खताचा किती वापर करतात याचा आकडाही स्पष्ट होणार असल्याने खतविक्रीत पारदर्शकता येणार आहे.

Web Title: Farmers will get Online fertilizer from one June