परभणी : पावसामुळे भिंत कोसळून बाप-लेकाचा करून अंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

पाडव्याच्या पहाटे सर्वजण पाडवा साजरा करण्याच्या तयारीत असतांनाच ही दुर्दैवी घटना घडली. भिंत पडण्याचा आवाज आल्याने शेजारी राहणारे नागरिक धावून गेले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या कस्तुरबा टेकाळे यांनी आवाज दिल्याने शेजाऱ्यांनी दार तोडून त्यांना बाहेर काढले. परंतु अरुण व मंदार यांच्या अंगावर पडल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही. 

सोनपेठ :  दीपावली पाडव्याच्या पहाटे पावसाने घराची भिंत कोसळून बाप लेकाचा भिंती खाली दबून करून अंत झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. 

सोनपेठ शहरातील देवी मंदिर परिसरात गावरस्कर यांच्या जुन्या वाड्यात किरायाने राहणाऱ्या टेकाळे कुटुंबियांवर पाडव्याच्या पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घराची भिंत कोसळून त्यात अरुण टेकाळे (वय ४५) व मंदार अरुण टेकाळे (वय ८) यांच्या अंगावर भिंत पडल्याने घरावरील फरशीचा स्लॅब कोसळून जागीच मृत्यू झाला. तर कस्तुरबा अरुण टेकाळे (वय ४०) या यात गंभीर जखमी झाल्या आहेत. 

पाडव्याच्या पहाटे सर्वजण पाडवा साजरा करण्याच्या तयारीत असतांनाच ही दुर्दैवी घटना घडली. भिंत पडण्याचा आवाज आल्याने शेजारी राहणारे नागरिक धावून गेले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या कस्तुरबा टेकाळे यांनी आवाज दिल्याने शेजाऱ्यांनी दार तोडून त्यांना बाहेर काढले. परंतु अरुण व मंदार यांच्या अंगावर पडल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही. 

थोड्या वेळानंतर पोलिस व इतर नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर धाडसी युवकांनी अरुण व मंदार यांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढले. ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्व शहरातून हळहळ व्यक्त होत आहे. 

सोनपेठ शहर व परिसरात सतत झालेल्या पावसामुळे अनेक जीर्ण व जुन्या झालेल्या वाड्यांच्या भिंती ढासळायला सुरुवात झाली आहे. या धोकादायक वाड्यांमध्ये नागरिक जीव धोक्यात घालून राहत आहेत. नगर परिषदेने अशा धोकादायक वाड्यांची पाहणी करून धोकादायक वाडे रिकामे करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून पुढे अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father and son dead in wall collapsed at Parbhani