साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिब्रिटो यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

'नवा करार' या भावानुवादाबद्दल दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय राज्य सरकारनेही त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. याआधी मराठी साहित्य ख्रिस्ती संमेलन, बंधुता साहित्य संमेलन, साहित्य-कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद दिब्रिटो यांनी भूषविले आहे.

लातूर : उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. साहित्य महामंडळाच्या रविवारी (ता. 22) झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. शिवाय, संमेलन 10 ते 12 जानेवारी 2020 दरम्यान घेण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. या दोन्ही निर्णयांची अधिकृत घोषणा लवकरच उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत केली जाणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होणार आहे. त्यामुळे महामंडळाची बैठक उस्मानाबाद येथे घेण्यात आली. या बैठकीत संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो, भारत सासणे, प्रविण दवणे, प्रतिभा रानडे या साहित्यिकांची नावे महामंडळाच्या घटक, संलग्न, समाविष्ट संस्थांनी ठेवली होती. यापैकी दिब्रिटो यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचे नाव संमेलनाध्यक्ष पदासाठी बैठकीत मांडले होते.

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यात होत आहे, त्यामुळे संमेलनाध्यक्ष मराठवाड्यातील असणार, अशी चर्चा काही महिन्यांपासून साहित्य वर्तुळात रंगली होती. त्यामुळे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ना. धों. महानोर, सुधीर रसाळ, रा. रं. बोराडे ही नावे पुढे आली. यापैकी एकाला संमेलनाध्यक्ष पदाचा मान मिळणार, असे वाटत असतानाच बोराडे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेला लेखी, रसाळ आणि महानोर यांनी तोंडी नकार दर्शवला. त्यानंतर आता चपळगाकर यांनीही पत्र पाठवून 'संमेलनाध्यक्षपदासाठी सध्या माझ्या नावाचा विचार करू नका' असे पत्र परिषदेला पाठवले होते.

'नवा करार' या भावानुवादाबद्दल दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय राज्य सरकारनेही त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. याआधी मराठी साहित्य ख्रिस्ती संमेलन, बंधुता साहित्य संमेलन, साहित्य-कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद दिब्रिटो यांनी भूषविले आहे. ‘सकाळ’मध्ये ओसिसच्या शोधात (1995), दीपमाळ (2001-02), ऋणानुबंध (2010), नातीगोती (2012) हे त्यांचे सदर गाजले.

दिब्रिटो यांची निवडक साहित्य संपदा
- परिर्वतानासाठी धर्म
- पर्वतावरील प्रवचन
- सुबोध बायबल
- तेजाची पावले
- सृजनाचा मोहोर
- सजृनाचा मळा
- गोतावळा
- नाही मी एकला (आत्मचरित्र)

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- काँग्रेसमधून ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जा : शशी थरूर

- 'कलम 370' वरून अमित शहांकडून पुन्हा शरद पवार लक्ष्य

- Vidhansabha 2019 : सत्ताधाऱ्यांनो, ‘चले जाव’! - शरद पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father Francis Dibrito was unanimously elected as president of the all India Marathi literature conference