ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडलेले बालक चुलत्याने हात दिल्याने बचावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - घरासमोर गेल्या पंधरा दिवसांपासून उघड्या पडलेल्या, चोक-अप झालेल्या ड्रेनेज चेंबरमध्ये खेळता खेळता कार्तिक साठे नावाचा दीड वर्षाचा मुलगा पडला. चेंबरमध्ये मुलगा पडल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ धावपळ करून त्या मुलाला बाहेर काढले. बेशुद्धावस्थेतील कार्तिकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. फाजलपुरा भागात मंगळवारी (ता. 27) सकाळी ही घटना घडली.

फाजलपुरा भागात महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तीन-साडेतीनशे घरांची वसाहत आहे. या वसाहतीतील बहुतांश लोक महापालिकेत नोकरीला आहेत. पंधरा दिवसांपासून एका ड्रेनेजच्या चेंबरवरचा ढापा तुटला. त्यातच ही ड्रेनेजलाइन चोक-अप झाल्याने चेंबरमध्ये घाण पाणी तुंबले. सुधीर साठे हे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांच्या घराजवळच हे चेंबर आहे. मंगळवारी (ता. 27) सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास त्यांचा दीड वर्षाचा मुलगा कार्तिक खेळत असताना या उघड्या चेंबरमध्ये पडला. घाणीने तुडुंब भरलेल्या या चेंबरमध्ये कार्तिक पूर्णपणे खाली गेला. त्याचे फक्‍त हात वर दिसत होते. नेमके याच वेळी त्याचे चुलते सुभाष साठे यांनी हे दृश्‍य पाहिले आणि त्यांनी आरडाओरड करीत धावत जाऊन कार्तिकचे हात पकडले. हा आवाज ऐकून संदीप चांदणे व अन्य लोक धावत आले. त्यांनी कार्तिकला चेंबरच्या बाहेर काढले. बेशुद्धावस्थेत कार्तिकला बाहेर काढून चंपा चौकातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती सुधारत आहे. नागरिकांनी सांगितले, की दहा-पंधरा दिवसांपासून उघड्या पडलेल्या चेंबरची आम्ही तक्रार केली आहे. चोक-अप काढून त्यावर ढापा टाकण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, याकडे कोणी लक्ष दिले नाही. यामुळे हा प्रसंग ओढवला. घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या काथार नावाच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याला संतप्त नागरिकांनी चोप दिला.

Web Title: father's brother escaped child

टॅग्स