फौजदार थडवे आणि सावंत यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर 

मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नांदेड पोलिस दलाच्या नायगाव ठाण्यात सध्या कार्यरत असलेले व महाराष्ट्र राज्य सेवा परिक्षा (पीएसआय) मध्ये ते राज्यात पहिले आलेले शिवराज थडवे हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात असलेल्या अतिशय जंगल भागातील धोंडराज ठाण्याचे प्रभारी म्हणून त्यांनी काम केले.

नांदेड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल नांदेड पोलिस दलातील दोन पोलिस उपनिरीक्षकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस महासंचालक यांचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. 

नांदेड पोलिस दलाच्या नायगाव ठाण्यात सध्या कार्यरत असलेले व महाराष्ट्र राज्य सेवा परिक्षा (पीएसआय) मध्ये ते राज्यात पहिले आलेले शिवराज थडवे हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात असलेल्या अतिशय जंगल भागातील धोंडराज ठाण्याचे प्रभारी म्हणून त्यांनी काम केले. ते नुकतेच २३ जुलैला नांदेड पोलिस दलात दाखल झाले आहेत. त्यांचे बंधु फौजदार संदीप थडवे हे शहर वाहतुक शाखेत कार्यरत आहेत.  

तसेच त्यांच्यासमवेत याच तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून मिथुन सावंत यांनी काम केले. ते सध्या मुखेड पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. या दोन्ही तरूण अधिकाऱ्यांनी अनेक जीवंत नक्षलवादी पकडून अटक केले होते. ज्यांच्यावर सरकारकडून लाखोंचे बक्षिस जाहीर होते. हे करत असताना श्री. थडवे आणि सावंत यांनी पोलिस दलाची कुठलीच जिवीत हानी होऊ दिली नाही. यासोबतच नक्षलवाद्यांनी पेरलेले जीवंत बॉम्ब शोधून नक्षलींना अटक केले. तसेच आदिवासी भागात समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली. पावसाळ्यात २२ गावांचा संबंध तुटणाऱ्या गावांसाठी नदीवर पुलाची उभारणी केली. पोलिस आणि आदिवासी यांच्या सलोख्याचे वातावरण निर्माण केले होते. त्यांच्या या कामाची दखल पोलिस महासंचालक कार्यालयाने घेतली. या दोन्ही उमद्या अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस महासंचालकांचे हे खात्यातील अत्यंत मानाचे समजल्या जाणारे पदक जाहीर झाले. त्यांना विशेष कार्यक्रमात हे पदक देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. त्यांचे पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे, सहाय्यक पोलिस अधिक्षक नुरूल हसन, पोलिस उपाधिक्षक (गृह) ए. जी. खान, अभिजीत फस्के, विशाल खांबे, पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे, सुभाष राठोड यांच्यासह पोलिस दलाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.